मुंबई, 25 मे : आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचा फास्ट बॉलर सोशल मीडियावर वारंवार ट्रोल होत आहे. बुधवारी रात्री झालेल्या प्ले-ऑफच्या सामन्यात नवीन उल हकने मुंबईच्या 4 विकेट घेतल्या, पण अखेर त्याच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे लखनऊचं यंदाच्या आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. लखनऊ आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी नवीनला ट्रोल केलं आहे. मुंबईच्या खेळाडूने आंब्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, पण काही वेळामध्येच त्याने हा फोटो डिलीट केला. या फोटोमध्ये मुंबईचे तीन खेळाडू होते.
मुंबई इंडियन्सचा खेळाडू संदीप वॉरियरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आंब्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्याच्यासोबत विष्णू विनोद आणि कुमार कार्तिकेय हे दोन खेळाडू दिसत आहेत. हे तीनही खेळाडू गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, असा इशारा करत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर टेबलवर आंबा ठेवण्यात आला आहे. गोड आंब्याचा सिझन, असं कॅप्शन संदीप वॉरियरने या फोटोला दिलं होतं, पण काही वेळातच त्याने हा फोटो डिलीट केला, पण चाहत्यांनी त्याच्या या फोटोचा स्क्रीनशॉट घेतला होता.
The sweet mangoes! pic.twitter.com/BM0VCHULXV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 24, 2023
विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात आयपीएल सामन्यादरम्यान मोठा वाद झाला होता. या वादाची सुरूवात मोहम्मद सिराज आणि नवीन उल हक यांच्यापासून झाली, पण नंतर विराट आणि नवीन यांच्यातही बाचाबाची झाली. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना हात मिळवत होते, तेव्हाही दोघांमध्ये वाद झाले. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने वाद मिटवण्यासाठी नवीनला विराटसमोर बोलावलं, पण नवीन उल हकने विराटसोबत बोलायलाही नकार दिला.
या वादामध्ये नंतर लखनऊचा मेंटर गौतम गंभीरनेही एण्ट्री घेतली, यानंतर विराट आणि गंभीरमध्येही वाद झाले. या भांडणानंतर विराट आणि नवीन उल हक यांच्यात सोशल मीडियावरूनही एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. मुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने लवकर विकेट गमावल्यानंतर नवीनने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये तो मुंबई-आरसीबीची मॅच टीव्हीवर बघताना आंबे खाताना दिसत होता. आंबे गोड आहेत, असं कॅप्शन त्याने या स्टोरीला दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.