मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : किंमत कमी पण कामात शेर, प्ले-ऑफमध्ये मुंबईचे 5 खेळाडू ठरणार एक्स-फॅक्टर

IPL 2023 : किंमत कमी पण कामात शेर, प्ले-ऑफमध्ये मुंबईचे 5 खेळाडू ठरणार एक्स-फॅक्टर

आयपीएलमध्ये मुंबईचा धमाका, पाच खेळाडू ठरले एक्स-फॅक्टर

आयपीएलमध्ये मुंबईचा धमाका, पाच खेळाडू ठरले एक्स-फॅक्टर

आयपीएल 2023 चा प्ले-ऑफ 2 सा सामना मुंबई आणि गुजरातमध्ये होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या टीमचा फायनलमध्ये प्रवेश होईल.

अहमदाबाद, 26 मे : आयपीएल 2023 चा प्ले-ऑफ 2 सा सामना मुंबई आणि गुजरातमध्ये होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या टीमचा फायनलमध्ये प्रवेश होईल. तसंच विजयी टीम 28 मे रोजी फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईने गुजरातचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता, तर एलिमिनेटरमध्ये मुंबईने लखनऊला धूळ चारली होती. लीग स्टेजमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर राहिल्यामुळे त्यांना फायनलमध्ये पोहोचण्याच्या दोन संधी मिळत आहेत. दोन्ही टीममधले खेळाडू बघितले तर सध्या तरी गुजरातची टीम संतुलित वाटत आहे.

हार्दिक पांड्याच्या टीममध्ये डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवातिया यांच्यासारखे धमाकेदार बॅटर आहेत, तर या मोसमात गुजरातकडे सर्वोत्तम बॉलिंग आक्रमण आहे. मोहम्मद शमी, राशिद खान, नूर अहमद आणि मोहित शर्मा हे चार बॉलर यंदाच्या आयपीएलमध्ये यशस्वी ठरले आहेत.

गुजरात आणि मुंबई यांच्यात आतापर्यंत 3 मॅच झाल्या आहेत, यातल्या 2 सामन्यांमध्ये मुंबईचा तर एका सामन्यामध्ये गुजरातचा विजय झाला आहे. रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, तिलक वर्मा, नेहल वढेरा यांच्यामुळे मुंबईचं बॅटिंग आक्रमण मजबूत आहे. तर आकाश मढवालने बॉलिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

मुंबईचे पाच प्लेअर ठरणार एक्स फॅक्टर

आकाश मढवाल : मुंबई इंडियन्सच्या बॉलिंग आक्रमणामध्ये 29 वर्षांच्या आकाश मढवालने धमाका केला आहे. 20 लाखांच्या बेस प्राईजवर आकाश मढवाल मुंबईच्या टीममध्ये दाखल झाला. हैदराबादविरुद्धच्या करो या मरो सामन्यात मढवालने 4 विकेट घेतल्या, तर लखनऊविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये त्याने 5 रन देऊन 5 विकेट मिळवल्या. या मोसमात मढवालने 5 सामन्यांमध्ये 13 विकेट घेतल्या.

तिलक वर्मा : या डावखुऱ्या बॅटरला टीम इंडियाचं भविष्य मानलं जात आहे. आयपीएल लिलावामध्ये मुंबईने तिलक वर्माला 70 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. तिलकने 10 सामन्यांमध्ये 42.85 च्या सरासरीने आणि 153.84 च्या स्ट्राईक रेटने 300 रन केल्या, ज्यामध्ये 58 फोर आणि 26 सिक्सचा समावेश आहे.

नेहल वढेरा : 20 लाख रुपयांचा हा डावखुरा बॅटर तिलक वर्माप्रमाणेच आक्रमक बॅटिंग करतो. नेहलने 13 सामन्यांमध्ये 29.63 ची सरासरी आणि 145.39 च्या स्ट्राईक रेटने 237 रन केले आहेत.

पियुष चावला : 2011 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा भाग असणारा पियुष चावला मुंबईचा या मोसमातला सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. 34 वर्षांच्या या लेग स्पिनरला मुंबईने 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. पियुषने 15 सामन्यांमध्ये 21.41 ची सरासरी आणि 7.75 च्या इकोनॉमी रेटने 21 विकेट घेतल्या आहेत.

जेसन बेहरनडॉर्फ : ऑस्ट्रेलियाच्या या डावखुऱ्या फास्ट बॉलरला मुंबईने 75 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. बेहरनडॉर्फ पियुष चावलानंतरचा मुंबईचा यशस्वी बॉलर आहे. बेहरनडॉर्फने 25.64 च्या सरासरीने आणि 9.44 च्या इकोनॉमी रेटने 14 विकेट घेतल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Gujarat Titans, IPL 2023, Mumbai Indians