मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज 22 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. मुंबईच्या होम ग्राऊंडवरील सामन्यात व्यंकटेश अय्यरचा जलवा पाहायला मिळाला असून त्याने आयपीएल 2023 मधील दुसरे शतक ठोकण्याचा मान मिळवला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पारपाडत आहे. या सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या केकेआरची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये केकेआरचा खेळाडू जगदीशनची विकेट पडली. त्यानंतर लागोपाठ केकेआरचे फलंदाज स्वस्तात बाद होत असताना व्यंकटेश अय्यरने मात्र मैदानात जम बसवून जबरदस्त कामगिरी केली.
व्यंकटेश अय्यरने केवळ 51 चेंडूत 104 धावा केल्या. व्यंकटेशने केकेआरसाठी केलेले शतक हे आयपीएल 2023 मधील दुसरे शतक ठरले. यापूर्वी हैद्राबादकडून हॅरी ब्रुकने आयपीएल 2023 मधील पहिले शतक ठोकले. केकेआरने मुंबई विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 185 धावा केल्या. तसेच मुंबई इंडियन्सला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 186 धावांचे आव्हान ठेवले.