कोलकाता, 16 मे : आयपीएल प्लेऑफमध्ये खेळण्याची कोलकाता नाइट रायडर्स टीमची आशा अद्याप थोडी कायम आहे. अर्थात, लखनौ सुपर जायंट्स टीमविरुद्धची शेवटची होम ग्राउंडवरची मॅच ते जिंकले तरच… तोपर्यंत बाकीच्या टीम्सच्या अन्य मॅचेस ते पाहत आहेत. तसं असलं, तरी चेन्नई सुपर किंग्ज टीमला हरवल्यानंतर संपूर्ण KKR टीम उत्साहात आहे. KKR टीमसाठी पहिल्यांदाच खेळल्यानंतर अफगाणिस्तानचा खेळाडू रहमानुल्ला गुरबाझ कोलकात्याच्या प्रेमात पडला आहे. अधिक नेमकेपणाने सांगायचं, तर त्याला कोलकात्याचे रसगुल्ले खूपच आवडू लागले आहेत. KKR टीमचा विकेटकीपर बॅट्समन असलेला गुरबाझ आयपीएलच्या प्रत्येक मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. तो अफगाणिस्तानातला क्रिकेटर असला, तरी भारतीय सिनेमे, क्रिकेट आणि भारतीय खाद्यपदार्थ यांबद्दल तो पॅशनेट आहे. KKR टीम जिथे जिथे खेळायला गेली, तिथे तिथे त्याने स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. सनरायझर्स हैदराबाद टीमविरुद्ध खेळायला गेलेला असताना बिर्याणीबद्दलची त्याची उत्सुकता चाळवली गेली. कोलकाता ही टीमची होम सिटी आहे. त्यामुळे कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीची ओळख गुरबाझला झाली. त्यातूनच तो कोलकात्यातल्या रसगुल्ल्यांच्या प्रेमात पडला. गुरबाझला भारतीय सिनेमांबद्दलचीही जाण आहे. नवा प्रत्येक भारतीय सिनेमा तो पाहतो. त्यामुळे भारतीय अभिनेते-अभिनेत्रींच्या अभिनयशैलीबद्दलही त्याला माहिती आहे. तिथूनच त्याला शाहरुख खानबद्दल आकर्षण निर्माण झालं.
गुरबाझ सांगतो, ‘माझ्यासाठी हे सारं एका स्वप्नासारखं आहे. मी शाहरुख खानचा खूप मोठा चाहता आहे आणि आता मी शाहरुख खानच्या टीममध्ये खेळतो आहे. KKR टीमसाठी खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. मी यासाठी टीम मॅनेजमेंटचे आभार मानू इच्छितो.’ ईडन गार्डनवर झालेली आयपीएलची पहिली मॅच पाहण्यासाठी शाहरुख खान स्वतः आला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या टीमवर कोलकाता नाइट रायडर्स टीमने मोठा विजय मिळवल्यानंतर टीमचं अभिनंदन करण्यासाठी शाहरुख खान स्वतः ड्रेसिंग रूममध्ये गेला होता. त्या भेटीचं अप्रूप गुरबाझच्या चेहऱ्यावर दिसत होतं. गुरबाझ म्हणाला, ‘तो माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण होता. शाहरुख खान जगातल्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. ते माझ्याशी ज्या पद्धतीने बोलले, त्याची मी अपेक्षा केली नव्हती. त्यांच्या बोलण्यात जी अदब, नम्रता होती, ती मला अनपेक्षित होती. ते जगातले सर्वोत्तम व्यक्ती आहेत.’ गुरबाझ आज जरी KKR टीममध्ये असला, तरी क्रिकेटर बनणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. त्याच्या कुटुंबीयांना क्रिकेटबद्दल अजिबात काहीही माहिती नव्हती. अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन नूर्झ मांगल याच्याकडून गुरबाझने प्रेरणा घेतली. महेंद्रसिंह धोनीकडून त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. धोनीच्या खेळातून गुरबाझ शिकत गेला. गुरबाझ एके काळी फुटबॉलही खेळला असून, त्यात त्याने गोलकीपर म्हणून भूमिका निभावली आहे. त्यामुळे त्याला क्रिकेट खेळायला लागल्यानंतर विकेटकीपर बनणं फारसं अवघड गेलं नाही.