नवी दिल्ली, 22 मे : आयपीएल 2023 च्या लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यामध्ये शुभमन गिलने धमाकेदार शतक केलं. गिलच्या या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव केला. या पराभवासोबतच आरसीबीचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. गुजरातच्या विजयाचा फायदा मुंबई इंडियन्सना झाला, कारण मुंबई प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरली. आरसीबी प्ले-ऑफमधून बाहेर झाल्यानंतर सोशल मीडियावरून शुभमन गिल आणि त्याच्या बहिणीवर निशाणा साधण्यात आला. आरसीबीचे चाहते असल्याचं सांगत काही जणांनी गिलच्या बहिणीबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केलं. यानंतर महिला आयोग ऍक्शन मोडमध्ये आला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांना इशारा दिला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. ‘गिलच्या बहिणीबाबत अपशब्द वापरणं खूपच लाजिरवाणं आहे, कारण ज्या टीमला ते फॉलो करत होते ती टीम हरली. याआधी आम्ही विराट कोहलीच्या मुलीबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात कारवाई केली होती. गिलच्या बहिणीबद्दल बोलणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत,’ असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिला आहे.
शुभमन गिलने आरसीबीविरुद्ध 52 बॉलमध्ये नाबाद 102 रन केले, ज्यामध्ये 5 फोर आणि 8 सिक्सचा समावेश होता. गिलने 200 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. या खेळीमुळे गिलला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. शुभमन गिलने आयपीएलच्या या मोसमात धमाकेदार कामगिरी केली आहे. गिलच्या या कामगिरीमुळे गुजरात आयपीएल 2023 च्या प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली. गिलने 14 सामन्यांमध्ये 680 रन केले, ज्यामध्ये 2 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.