मुंबई, 21 एप्रिल : आयपीएल2023 ला सुरुवात झाली असून यात काल दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धचा सामना 4 विकेट्सने जिंकून यंदाच्या आयपीएलमधील त्यांचं विजयाचं खात उघडलं आहे. याविजयानंतर दिल्ली कॅपिटल्ससाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुरुवारी 20 एप्रिल रोजी सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी दिल्लीचा संघ इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लइटमधून प्रवास करत असताना या प्रवासादरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या काही खेळाडूंचं सामान चोरीला गेल होत. याबाबत एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. अशातच आज अखेर दिल्ली कॅपिटल्सचे हरवलेले सामान त्यांना परत मिळाले आहे.
चोरीला गेलेल्या सामानामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर, यश धुल, मिचेल मार्शल, रिपल पटेल या खेळाडूंचे सामान होते. या सामानात 9 बॅट, थायपॅड, ग्लोव्हज, हेल्मेट, गॉगल, क्रिकेट किट्स आणि अन्य सामानाचा समावेश होता. हरवलेल्या सामानाची किंमत सुमारे 14 ते 15 लाखांच्या घरात होती. अखेर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचं बरचसं सामान जप्त केलं आहे. त्यानंतर दिल्लीचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं इन्स्टाग्रामवर स्टेटस पोस्ट करत पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.