मुंबई, ८ एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात हायव्होल्टेज सामना पारपडला. या सामन्यात मुंबईच्या होम ग्राउंडवर चेन्नईने मुंबईचा पराभव केला आहे. चेन्नईने आयपीएल 2023 मधील त्यांचा दुसरा सामना जिंकला असून वानखेडेवर झालेल्या सामन्यात मुंबईवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. तब्बल दोन वर्षांनी मुंबई इंडियन्स ने त्यांचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळला. या सामन्यात सुरुवातीला एम एस धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची जोडी ओपनिंग करण्यासाठी मैदानात उतरली. सुरुवातीचे काही ओव्हर्स मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली, मात्र अखेर तुषार देशपांडेने रोहित शर्माची विकेट घेतली. रोहितने संघासाठी 21 धावा केल्या त्यानंतर एका मागोमाग एक मुंबईचे फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांची शिकार ठरले. यादरम्यान ईशान किशनने 32, कॅमेरून ग्रीनने 12, तिलक वर्माने 22, टीम डेविडने 31 धावा केल्या.
अखेर 20 ओव्हरमध्ये मुंबईचा संघ 8 विकेट्स गमावून 157 धावा करू शकल्या. चेन्नईच्या गोलंदाजांपैकी तुषार देशपांडे आणि सॅन्टनरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले तर रवींद्र जडेजाला मुंबईच्या 3 विकेट घेण्यात यश आले. तसेच मागलाने चेन्नईसाठी 1 विकेट घेतली. IPL 2023 MI vs CSK : रहाणेने मुंबईच्या जखमेवर मीठ चोळलं, होमग्राऊंडवरच काढली रोहितच्या बॉलर्सची पिसं! चेन्नई समोर विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 158 धावांच आव्हान असताना चेन्नई कडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे यांची जोडी ओपनिंगसाठी मैदानात आली. परंतु पहिल्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर डेव्हॉन कॉन्वेची विकेट पडली. त्यानंतर मैदानात आलेल्या अजिंक्य रहाणेने संघासाठी झुंजार खेळी केली. त्याने अवघ्या 19चेंडूत अर्धशतक ठोकले. तसेच संघासाठी 61 धावांची कामगिरी केली. यासोबतच ऋतुराज गायकवाडने 40, शिवम दुबेने 28 तर अंबाती रायडूने नाबाद 20 धावा केल्या. चेन्नईने 12 चेंडू आणि 7 विकेट्स राखून विजयाचे आव्हान पूर्ण केले आणि मुंबईला त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभवाचे पाणी पाजले. मुंबईकडून पियुष चावला, कुमार कार्तिकेय आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.