मुंबई, 13 मे : आयपीएल 2022 चा (IPL 2022) जुना फॉर्म विसरून विराट कोहली (Virat Kohli) पंजाब किंग्सविरुद्धच्या (Punjab Kings vs RCB) सामन्यात बॅटिंगसाठी मैदानात उतरला. पंजाबने आरसीबीला विजयासाठी 210 रनचं आव्हान दिलं होतं, त्यामुळे आरसीबीला आक्रमक सुरूवात करणं गरजेचं होतं. विराटनेही अगदी तशीच सुरूवात केली. दोन फोर आणि एका सिक्सच्या मदतीने विराटने 14 बॉलमध्ये 20 रन केले, तेव्हा पुन्हा एकदा जुना विराट बघायला मिळणार, अशी आशा फक्त आरसीबी आणि स्टेडियममधल्या प्रेक्षकांनाच नाही, तर जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसमोर निर्माण झाली, पण आशेवर पुढच्याच बॉलला पाणी पडलं. रबाडाने टाकलेल्या शॉर्ट बॉलवर विराट लेग साईडला पूल मारायला गेला, पण त्याच्या ग्लोव्हज आणि मांडीला लागून बॉल फाईन लेगला उभ्या असलेल्या राहुल चहरकडे गेला. अंपायरने सुरूवातीला विराटला आऊट दिलं नाही, यानंतर पंजाबने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये बॉल विराटच्या ग्लोव्हजचा अलगद घासून गेल्याचं दिसलं, त्यामुळे थर्ड अंपायरने विराटला आऊट दिलं. आऊट झाल्यानंतर विराट पॅव्हेलियनमध्ये जाताना खूपच हताश दिसला. आकाशाकडे बघून विराट काहीतरी म्हणाला. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Never seen him like this 🥺💔 @imVkohli pic.twitter.com/cikv9lFZnH
— Hemanth Teju (@HemanthTeju17) May 13, 2022
आयपीएलच्या या मोसमात विराटची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. त्याने 13 मॅचच्या 13 इनिंगमध्ये 19.67 ची सरासरी आणि 113.46 च्या स्ट्राईक रेटने फक्त 236 रन केले आहेत. विराटच्या बॅटमधून या मोसमात फक्त एक अर्धशतक आलं आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात झालेल्या 54 रनच्या पराभवामुळे आरसीबीचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न आणखी कठीण झालं आहे. एवढा मोठा पराभव झाल्यामुळे आरसीबीचा नेट रनरेट वजा झाला आहे, त्यामुळे आता त्यांना उरलेली एक मॅच मोठ्या फरकाने जिंकावी लागणार आहे, तसंच इतर टीमच्या कामगिरीवरही आरसीबीला अवलंबून राहावं लागणार आहे.