जयपूर, 26 डिसेंबर : आयपीएल 2022 साठी सगळ्या 8 टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी नोव्हेंबर महिन्यात जाहीर केली. पंजाब किंग्सने मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंग या दोन खेळाडूंनाच रिटेन केलं. आयपीएल 2022 साठी पंजाब किंग्सने (Punjab Kings) शाहरुख खानला (Shahrukh Khan) रिटेन केलं नाही, पण हाच शाहरुख खान आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) धमाकेदार कामगिरी करत आहे. यावेळी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 टीम खेळणार आहेत, त्यामुळे लिलावात शाहरुख खानला मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. आयपीएल लिलावाच्या तारखेची बीसीसीआयने (BCCI) अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. शाहरुख खानने रविवारी विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Himachal Pradesh vs Tamil Nadu) शानदार कामगिरी केली. सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शाहरुखने तामिळनाडूकडून खेळताना 21 बॉलमध्ये 42 रन केले, यात त्याचा स्ट्राईक रेट 200 चा होता. त्याने 3 फोर आणि 3 सिक्स मारले, म्हणजेच त्याने 30 रन बाऊंड्रीच्या मदतीने केल्या. पहिल्यांदा बॅटिंग करताना तामिळनाडूने 314 रन केले, यात दिनेश कार्तिकने 116 रनची खेळी केली. 26 वर्षांच्या शाहरुख खानने विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात आक्रमक बॅटिंग केली आहे. 8 मॅचच्या 7 इनिंगमध्ये त्याने 42 च्या सरासरीने 253 रन केले, यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 186 चा होता. स्पर्धेमध्ये त्याने 19 फोर आणि 20 सिक्स लगावले, म्हणजेच त्याने 39 बॉलमध्ये 196 रन बाऊंड्रीच्या माध्यमातून बनवले. नाबाद 79 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये पंजाब किंग्सने शाहरुख खानला 5.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मागच्या मोसमात 11 मॅचमध्ये त्याने 22 च्या सरासरीने 153 रन केले होते, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 134 चा होता. यावेळी शाहरुखवर मागच्यावेळपेक्षा जास्तची बोली लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.