मुंबई, 12 फेब्रुवारी : कृणाल पांड्या (Krunl Pandya) आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda) या टीम इंडियाच्या खेळाडूंमधील वाद चांगलाच गाजला होता. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy) बडोद्याच्या पहिल्या सामन्याआधी दीपक हुड्डाचं कर्णधार कृणाल पांड्यासोबत (Krunal Pandya) भांडण झालं. यानंतर दीपक हुड्डा बायो-बबल सोडून निघून गेला. वादानंतर दीपक हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिलं आणि कर्णधार कृणाल पांड्यावर शिव्या दिल्याचे आणि करियर बरबाद केल्याचे आरोप केले. बडोदा क्रिकेट असोसिएशनने मात्र हुड्डाची ही वर्तणूक शिस्तभंग असल्याचं सांगत त्याचं संपूर्ण मोसमासाठी निलंबन केलं. बडोद्यानं निलंबन केल्यानंतर हुड्डानं राजस्थानकडून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याची वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये निवड झाली होती. टीम इंडियाकडून समाधानकारक कामगिरी केलेल्या हुड्डाला लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) 5 कोटी 75 लाखांना खरेदी केले.
Talented Munda, Deepak Hooda! 😎#TATAIPLAuction #IPLAuction #LucknowSuperGiants pic.twitter.com/VxvKDlSsof
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) February 12, 2022
विशेष म्हणजे हुड्डानंतर लखनऊनं कृणाल पांड्याला 8 कोटी 25 लाख रूपयांना खरेदी केले. त्यामुळे एकमेकांचा चेहराही न बघणारे हुड्डा आणि कृणाल आता एकाच आयपीएल टीममध्ये खेळणार आहेत.
कृणाल पांड्या यापूर्वी मुंबई इंडियन्सकडे होता. मुंबई इंडियन्सच्या कोअर टीमचा सदस्य असलेल्या कृणालला यंदा टीमनं रिटेन केले नव्हते. त्यानंतर मुंबईनं यंदा त्याच्यावर बोली देखील लावली नाही. कृणालचा भाऊ हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरार टायटन्स टीमचा कॅप्टन आहे. यंदा आयपीएलमध्ये पांड्या बंधू एकमेकांच्या विरूद्ध खेळणार आहेत.