मुंबई, 22 मार्च : आयपीएल 2022 चा मोसम (IPL 2022) सुरू व्हायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे, त्याआधी सगळ्या 10 टीम जोरदार तयारी करत आहेत. यावेळी अनेक टीमनी युवा खेळाडूंना संधी दिली आहे, यातलंच एक नाव म्हणजे बेबी एबी. दक्षिण आफ्रिकेच्या 18 वर्षांच्या डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) अल्पावधीच क्रिकेट विश्वात नाव कमावलं आहे. डेवाल्डची बॅटिंग दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सची ( AB De Villiers) आठवण करून देते, त्यामुळे त्याला बेबी एबी म्हणलं जातं. आयपीएल लिलावात डेवाल्डला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) विकत घेतलं. डेवाल्ड ब्रेविसने आयपीएल 2022 च्या तयारीला सुरूवात केली आहे. मुंबई इंडियन्ससोबतच्या आपल्या पहिल्या ट्रेनिंग सेशनमध्ये डेवाल्डने आपल्या बॅटिंगमधून चाहत्यांना एबी डिव्हिलियर्सची झलक दाखवली. याचा एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सने युट्यूबवर शेयर केला आहे. एका मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये डेवाल्ड अगदी सहज खेळताना दिसत आहे. डेवाल्डने नेटमध्ये फास्ट बॉलरना रिव्हर्स स्वीपही मारल्या आणि आपण एबी प्रमाणेच 360 डिग्री प्लेयर असल्याचं दाखवून दिलं. डेवाल्डने नेट प्रॅक्टिसमध्ये जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवरही चांगले शॉट मारले.
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये धमाका डेवाल्ड ब्रेविसने यावर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये धमाका केला होता. तो स्पर्धेतला सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. 6 मॅचमध्ये त्याने 84 पेक्षा जास्तच्या सरासरीने 506 रन केले होते. 18 वर्षांच्या या खेळाडूने वर्ल्ड कपमध्ये 2 शतकं आणि 3 अर्धशतकं केली. या कामगिरीमुळे अनेक फ्रॅन्चायजीचं लक्ष त्याच्यावर होतं. मुंबईने डेवाल्डला 3 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. डेवाल्डने आतापर्यंत 9 टी-20 मॅच खेळल्या, यात त्याने 25.87 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 207 रन केले. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणारी मुंबई इंडियन्स या मोसमातला पहिला सामना 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Mumbai Indians vs Delhi Capitals) ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळणार आहे. डेवाल्डची ही बॅटिंग बघून त्याला पहिल्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उतरवेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.