मुंबई, 4 एप्रिल : आयपीएल 2022 मधील (IPL 2022) रविवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) 54 रननं मोठा पराभव झाला. पंजाब किंग्जनं (Punjab Kings) दिलेलं 181 रनचं आव्हान चेन्नईला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 18 ओव्हरमध्ये 126 रनवर ऑल आऊट झाली. पंजाब विरूद्ध चेन्नईची बॅटींग गडगडली. त्यांच्या फक्त 4 बॅटर्सनी दोन अंकी रन केले. चेन्नईच्या अनुभवी खेळाडूनं निराशा केली केली. त्याचवेळी पंजाबचा नवोदीत विकेट किपर जितेश शर्मानं (Jitesh Sharma) पहिल्याच मॅचमध्ये प्रभावित केले. शर्मानं सुरूवातीला 17 बॉलमध्ये 26 रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. आयपीएलमध्ये पहिलीच मॅच खेळणाऱ्या जितेशनं या खेळीत 3 सिक्स लगावले. त्यानंतर अंबाती रायुडूचा उजवीकडे झेपावत सुरेख कॅच पकडला. सीएसकेच्या विकेट्स एका बाजूनं जात असताना माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) दुसऱ्या बाजूनं किल्ला लढवत होता. शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीची विकेटही शर्माच्या हुशारीमुळेच पंजाबला मिळाली. पंजाबकडून राहुल चहरनं 18 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर शर्मानं धोनीचा कॅच पकडला. मैदानातील अंपायरनं धोनी नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला होता. पण, शर्मा धोनी आऊट असल्यावर ठाम होता. त्याच्या आग्रहामुळेच कॅप्टन मयंक अग्रवालनं रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. थर्ड अंपायरच्या रिप्लेमध्ये धोनीच्या बॅटला लागून शर्मानं कॅच घेतल्याचं स्पष्ट झालं. धोनी आऊट होताच सीसकेची शेवटची आशाही संपुष्टात आली. त्यानंतर पुढच्या 5 बॉलमध्ये टीम ऑल आऊट झाली आणि टीमचा पराभव झाला. IPL 2022 : सलग 3 पराभवानंतर CSK अडचणीत, कॅप्टन जडेजानं सांगितला सर्वात मोठ्या दुखण्यावर उपाय या सामन्यात सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, पण लियाम लिव्हिंगस्टोनच्या तडाख्याने पंजाबने 180 रनपर्यंत मजल मारली. लिव्हिंगस्टोनने 32 बॉलमध्ये 60 रन केले. पहिल्या 10 ओव्हरनंतर पंजाबला 200 रनपर्यंत मजल मारता येईल, असं वाटत होतं, पण सीएसकेच्या बॉलरनी अखेरच्या 10 ओव्हरमध्ये टिच्चून बॉलिंग करत पंजाबला 180 रनवर रोखलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.