मुंबई, 15 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) ला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, त्याआधी सगळ्या 10 टीम नव्या मोसमासाठीच्या रणनिती ठरवत आहेत. क्रिकेट चाहतेही आयपीएल सुरू व्हायची वाट पाहत आहेत, पण त्याआधी बीसीसीआयने (BCCI) आयपीएलचे नियम आणखी कठोर केले आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2022 मध्ये बायो-बबलच्या (Bio Bubble) नियमांचं उल्लंघन करणाऱ्या टीम आणि खेळाडूंवर कठोर कारवाई होणार आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार बायो-बबलचा नियम तोडल्यास बीसीसीआय खेळाडूंवर मॅच खेळण्याची बंदी, पॉईंट कट आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड करणार आहे. आयपीएल 2021 बायो-बबलच्या उल्लंघनामुळे स्थगित करण्यात आलं होतं, त्यावेळी टीमच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता, ज्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. अखेर काही महिन्यांनी युएईमध्ये आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडचं आयोजन केलं गेलं. खेळाडू किंवा अधिकाऱ्यांनी बायो-बबल नियम तोडले तर… पहिली चूक : पहिल्यांदा बायो-बबलचा नियम तोडला तर 7 दिवस क्वारंटाईन, तसंच या काळात खेळल्या गेलेल्या मॅचची फी मिळणार नाही. दुसरी चूक : दुसऱ्यांदा बायो-बबल तोडल्यास 7 दिवस क्वारंटाईन आणि एक मॅचचं निलंबन (बिना वेतन) तिसरी चूक : संपूर्ण मोसमासाठी बाहेर आणि बदली खेळाडूही मिळणार नाही. कुटुंबाच्या सदस्याने बबल तोडला तर… पहिली चूक : 7 दिवस क्वारंटाईन दुसरी चूक : उरलेल्या मोसमासाठी बायो-बबलमधून बाहेर जर आयपीएल 2022 मध्ये फ्रॅन्चायजी बाहेरच्या व्यक्तीला बायो-बबलमध्ये आणत असेल, तर शिक्षा म्हणून 1 कोटी रुपये द्यायला लागू शकतात. तसंच अशी चूक पुन्हा झाली तर टीमचा एक पॉईंट कट केला जाईल, तिसऱ्यांदा चूक झाली तर दोन पॉईंट कट केले जातील. कोरोना व्हायरसाच धोका लक्षात घेता बीसीसीआयने मुंबई आणि पुण्यात चार स्टेडियममध्येच लीग स्टेजच्या 70 मॅचचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 20, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15, नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये 20 आणि पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये 15 मॅच होतील. सगळ्या टीम वानखेडे आणि डी.वाय.पाटील स्टेडियमवर 4-4 मॅच तर ब्रेबॉर्न आणि पुण्यात 3-3 मॅच खेळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.