मुंबई, 5 मे : बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे आयपीएलचा (IPL 2021) यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयला (BCCI) हा निर्णय घ्यावा लागला. आयपीएल स्थगित झाल्यानंतर इंग्लंडचे काही खेळाडू त्यांच्या घरी निघून गेले आहेत, तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांच्या देशात जायला परवानगी नसल्यामुळे ते मालदीवला जाणार आहेत. न्यूझीलंडचे खेळाडू मात्र काही काळ भारतातच थांबणार आहेत. न्यूझीलंडचे क्रिकेटपटू (New Zealand Cricket) 10 मेपर्यंत भारतात राहतील, त्यानंतर ते ब्रिटनला रवाना होतील, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेटर्स असोसिएशनने दिली. याशिवाय न्यूझीलंडचे इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ चार्टर्ड फ्लाईटने न्यूझीलंडमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड प्लेयर्स असोसिएशनचे प्रमुख हीथ मिल्स यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत फक्त ब्रिटीश नागरिकांनाच भारतातून इंग्लंडमध्ये परतण्याची परवानगी आहे. या नागरिकांना सरकारने सांगितलेल्या ठिकाणी 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. ‘ब्रिटनमध्ये 11 मे पर्यंत इतर देशाच्या नागरिकांना प्रवासावर निर्बंध असल्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना प्रवास करता येणार नाही, त्यामुळे त्यांना भारतात राहावं लागणार आहे. हे आव्हानात्मक आहे,’ असं मिल्सने क्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं. केन विलियमसनशिवाय ट्रेन्ट बोल्ट, काईल जेमिसन, मिचेल सॅन्टनर, क्रिस डोनाल्डसन (ट्रेनर), टॉमी सिमसेक (फिजियो), लॉकी फर्ग्युसन, जेम्स नीशम आणि फिन एलन यांचा समावेश आहे. हे खेळाडू टेस्ट सीरिजशिवाय इंग्लंडमधल्या टी-20 ब्लास्टमध्ये सहभागी होणार आहेत. न्यूझीलंडची टीम 2 जूनपासून इंग्लंडविरुद्ध (England vs New Zealand) 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. यानंतर साऊथम्पटनमध्ये 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. न्यूझीलंडचे स्टीफन फ्लेमिंग, ब्रेण्डन मॅक्कलम, काईल मिल्स, शेन बॉण्ड, माईक हेसन टीम सायफर्ट, एडम मिल्ने, स्कॉट कुगलाईन आणि जेम्स पेमेंट न्यूझीलंडला रवाना होतील. न्यूझीलंडला जाणाऱ्या खेळाडूंसाठी हे आव्हान आहे, जर एक किंवा दोन फ्रॅन्चायजींनी चार्टर्ड विमानाची सोय केली तर चांगलं होईल, पुढच्या 24 तासांमध्ये याची माहिती मिळेल, असं मिल्स यांनी सांगितलं. भारतातून न्यूझीलंडला जाण्यासाठी फार विमानं नाहीत, त्यामुळे ही अडचण आहे, असं मिल्स यांनी सांगितलं. न्यूझीलंडचे 17 सदस्य आयपीएलमध्ये सहभागी झाले होते, यामध्ये 10 खेळाडू होते. खेळाडू जोपर्यंत घरी पोहोचत नाहीत, तोपर्यंत आमच्यासाठी आयपीएल संपलेली नाही, अशी हमी बीसीसीआयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.