चेन्नई, 18 एप्रिल : पाच वेळची आयपीएल (IPL) चॅम्पियन असलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळत असलेल्या मुंबईचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या (RCB) पहिल्या सामन्यात पराभव झाला, यानंतर कोलकाता (KKR) आणि हैदराबादविरुद्ध (SRH) मुंबईने विजय मिळवला.
मुंबईला यंदाच्या मोसमातल्या पहिल्या तीन सामन्यात एकदाही 160 रनचा आकडा ओलांडता आला नाही. मुंबईने तिन्ही सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग केली. बँगलोरविरुद्ध त्यांनी 159 रन केले, तर कोलकात्याविरुद्ध 152 रन आणि हैदराबादविरुद्ध मुंबईला 150 रनपर्यंत मजल मारता आली. मागच्या 7 वर्षातली मुंबईची ही सगळ्यात खराब कामगिरी आहे. याआधी 2014 सालीही मुंबईला पहिल्या तीन सामन्यांमध्ये 160 रनचा आकडा गाठता आला नव्हता. यावेळी कोणत्याही टीमला घरच्या मैदानात सामना खेळता येणार नाही, याचाही टीमच्या कामगिरीवर परिणाम होत आहे.
मुंबईच्या टीममध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), क्विंटन डिकॉक (Quinton De Kock), इशान किशन (Ishan Kishan), कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत. पण तरीही पहिल्या तीन सामन्यांमध्ये मुंबईच्या एकाच बॅट्समनला अर्धशतक करता आलं आहे. सूर्यकुमार यादवने केकेआरविरुद्ध 56 रनची खेळी केली होती. कर्णधार रोहित शर्माचा सर्वाधिक स्कोअर 43 तर डिकॉकचा सर्वाधिक स्कोअर 40 आहे. इशान किशनने तीन सामन्यांमध्ये फक्त 41 रन केले केले आहेत. हार्दिक पांड्याचा सर्वाधिक स्कोअर 15 रन आहे.
एकीकडे मुंबईच्या बॅट्समननी निराशा केली असली तर बॉलरच्या कामगिरीमुळे मुंबईला दोन विजय मिळाले. लेग स्पिनर राहुल चहरने (Rahul Chahar) सर्वाधिक 7 विकेट घेतल्या. त्याला केकेआरविरुद्ध 4 आणि हैदराबादविरुद्ध 3 विकेट मिळवल्या. तर ट्रेन्ट बोल्टला (Trent Boult) 6 विकेट घेण्यात यश आलं आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या आहेत. बुमराहचा इकोनॉमी रेट तर 6 पेक्षाही कमी आहे. बुमराह शेवटच्या ओव्हरमधील कामगिरीमुळे मुंबईला विजय मिळवून देण्यात मोलाचं योगदान देत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma