दुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल 2021 ची फायनल (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची रेकॉर्ड नववी फायनल आहे. याआधीच्या 8 फायनलपैकी 3 वेळा चेन्नईला विजय मिळवता आला. 2010, 2011 आणि 2018 साली चेन्नईने आयपीएल ट्रॉफी पटकावली, तर 2008, 2010, 2012, 2013, 2015 आणि 2019 साली चेन्नईचा फायनलमध्ये पराभव झाला, यातल्या तीनवेळा चेन्नईला मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये धूळ चारली. आतापर्यंत चेन्नई जेवढ्या आयपीएल फायनल खेळली, त्यातल्या प्रत्येक सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) हे दोन्ही खेळाडू होते. यंदाच्या मोसमात मात्र रैना फायनलमध्ये खेळेल का नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आजच्या सामन्यात जर धोनीने रैनाला संधी दिली नाही, तर चेन्नई पहिल्यांदाच आयपीएल फायनलमध्ये रैनाशिवाय मैदानात उतरेल. सुरेश रैनाची आयपीएल कारकिर्द सुरेश रैनाने 205 आयपीएल सामन्यांमध्ये 32.52 च्या सरासरीने आणि 136.73 च्या स्ट्राईक रेटने 5,528 रन केले. यामध्ये एक शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून म्हणजे 2008 पासून रैना चेन्नईसोबतच होता, पण सीएसकेवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आल्यानंतर 2017 आणि 2018 साली तो गुजरात लायन्स टीममध्ये होता. 2020 साली रैनाने आयपीएलमधून माघार घेतली होती. रैनाचा खराब फॉर्म सुरेश रैनाला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चमकदार कामगिरी करता आली नाही. 12 सामन्यांमध्ये रैनाने 18 च्या सरासरीने 160 रन केले, यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. रैनाला दुखापत झाल्यामुळे धोनीने रॉबिन उथप्पाला संधी दिली. दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर-1 च्या सामन्यात उथप्पाने आव्हानाचा पाठलाग करताना 44 बॉलमध्ये 63 रनची खेळी केली, त्यामुळे चेन्नईला फायनल गाठता आली. सुरेश रैनाची दुखापत आता पूर्णपणे बरी झाली आहे, त्यामुळे धोनी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये नसलेल्या रैनाला संधी देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.