नवी दिल्ली, 3 मे : आयपीएलच्या यंदाच्या मोसमावर (IPL 2021) आलेलं कोरोनाचं संकट संपता संपत नाहीये. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) यांच्या टीममधले सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) टीम आयसोलेशनमध्ये गेली आहे. तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) या टीमनी आज सरावही केला नाही. कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandip Warrior) हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा मागचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला, या सामन्यात वरुण चक्रवर्ती कोलकात्याच्या टीममध्ये होता, त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्सच्या संपर्कात आला होता, म्हणून दिल्लीची टीम आयसोलेट झाली आहे. बीसीसीआयनेच (BCCI) दिल्ली कॅपिटल्सला आयसोलेट व्हायला सांगितल्याचं वृत्त आहे. दुसरीकडे दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे (DDCA) मैदानात काम करणारे 5 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पण दिलासादायक बाब म्हणजे पॉझिटिव्ह आलेले हे कर्मचारी मागचा आठवडाभर मैदानात आले नव्हते. चेन्नई सुपरकिंग्सच्या टीममधील 3 सदस्यांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली, पण यातला एकही जण खेळाडू नाही. असं असलं तरी त्यांचा बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipati Balaji) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मुंबई आणि चेन्नई यांच्यातल्या सामन्यादरम्यान बालाजी डग आऊटमध्ये होता, तसंच तो चेन्नई आणि मुंबई इंडियन्सच्याही संपर्कात आला होता, त्यामुळे आता मंगळवारी होणारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यातल्या मॅचवर गंडांतर आलं आहे. मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना व्हायचा असेल, तर खेळाडूंच्या दोन टेस्ट निगेटिव्ह येणं गरजेचं आहे. कोलकात्याच्या खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे सोमवारचा बँगलोर (RCB) आणि कोलकाता यांच्यात अहमदाबादमध्ये होणारा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.