
कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) या मोसमात व्यंकटेश अय्यरच्या (Venkatesh Iyer) रुपात धडाकेबाज ओपनर सापडला आहे. बँगलोरच्या (RCB) बॉलिंगवर आक्रमण केल्यानंतर व्यंकटेश अय्यरने मुंबई इंडियन्सनाही (MI vs KKR) धुतलं. 25 बॉलमध्येच व्यंकटेश अय्यरने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. 30 बॉलमध्ये 53 रन करून अय्यर आऊट झाला. अय्यरच्या या खेळीमध्ये 4 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.

मुंबईविरुद्धच्या मॅचआधी व्यंकटेश अय्यरने विराट कोहलीच्या आरसीबीविरुद्धही विस्फोटक खेळी केली. व्यंकटेशनी 27 बॉल्समध्ये 7 फोर आणि एका सिक्सच्या बळावर नाबाद 41 रन्स केल्या.

व्यंकटेश अय्यर हा मध्य प्रदेशचा 26 वर्षांचा ऑलराउंडर क्रिकेटर (All Rounder Cricketer) आहे. त्याने देशांतर्गत 38 टी-20 क्रिकेट सामन्यांत 2 अर्धशतकांसोबतच 36 च्या सरासरीने 724 रन्स केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 138 आहे. याच प्रकारात त्याने 26 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या असून त्याची इकॉनॉमी 7 पेक्षा कमी आहे.

10 फर्स्ट क्लास मॅचमध्ये त्याने 545 रन्स केले असून 7 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच 24 लिस्ट मॅचमध्ये 849 रन्स केल्या आहेत आणि 10 विकेट्सही घेतल्या आहेत.

या वर्षी फेब्रवारी महिन्यात विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत व्यंकटेश अय्यरने तडाखेबाज 198 रन्सची खेळी केली. त्याने 146 बॉल्समध्ये 20 फोर आणि 7 सिक्स मारले होते. 122 रन्स त्याने केवळ फोर मारून पूर्ण केले होते. त्याचा हा खेळ पाहूनच त्याला आयपीएलमधील केकेआरच्या (IPL KKR) संघात स्थान देण्यात आलं.

आपण हुशार विद्यार्थी असल्याचं व्यंकटेशनेसांगितलं. दक्षिण भारतातल्या कुटुंबामध्ये खेळ हा दुसरा पर्याय असतो. आई-वडील मुलांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला सांगतात. आईने मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मी घरामध्ये पुस्तकांमध्येच असायचो, तेव्हा आई मला बाहेर खेळायला पाठवायची, असं व्यंकटेश म्हणाला.

सीए आणि बीकॉम डिग्री मिळवण्यासाठी अय्यरने एडमिशनही घेतली होती. 2016 साली त्याने इंटरमीडिएट परीक्षेमध्येही टॉप केलं होतं. त्यावेळी अय्यरकडे क्रिकेट किंवा सीए यापैकी एकच पर्याय होता. सीए फायनल परीक्षा देणं म्हणजे क्रिकेट सोडणं किंवा काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेणं, पण त्याने क्रिकेट निवडलं.

'मी सीए सोडून एमबीए फायनान्स करण्याचं ठरवलं. एन्ट्रन्स एक्झाममध्ये मला चांगले मार्क मिळाले होते. तसंच चांगल्या कॉलेजमध्येही एडमिशन मिळाली होती. माझे शिक्षक चांगले होते आणि त्यांना क्रिकेट आवडायचं. मी चांगला खेळत आहे हे त्यांना दिसलं, त्यामुळे त्यांनी मला लेक्चरला येण्यापासून सूट दिली, तसंच नोट्सही दिल्या,' अशी प्रतिक्रिया अय्यरने दिली.

'क्रिकेट आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणं मला फार कठीण गेलं नाही. मी कायमच हुशार विद्यार्थी होतो. मी क्रिकेटपटू नसतो तर आयआयटी किंवा आयआयएमध्ये असतो. 2018 साली मला बँगलोरमध्ये नोकरीही मिळाली होती, पण क्रिकेटसाठी मी ती नोकरी सोडली,' असं वक्तव्य अय्यरने केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.