सोलापूर, 16 जानेवारी : पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने मानाची गदा पटकावली. पण सध्या चर्चा आहे ती सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या सिकंदर शेखची. सेमीफायनलमध्ये महेंद्र गायकवाडविरुद्धच्या लढतीत त्याचा पराभव झाला. गुणांच्या फरकाने महेंद्र गायकवाडने कुस्ती जिंकत फायनल गाठली होती. पण यात पंचांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे. आता सिकंदरच्या आई-वडिलांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंचांचा निर्णय चुकलाय, आमच्या मुलावर अन्याय झालाय असं सिकंदर शेखचे वडील रशीद पैलवान आणि त्यांच्या आईने म्हटलंय. आम्ही सिकंदरला हमाली करून मोठं केलं. दिवसरात्र काबाडकष्ट करून पैलवान केलं. सिकंदरनेसुद्धा दिवसरात्र एक करून सराव केला. उपांत्य फेरीत त्याला कमी गुण दिले हे निंदनीय आहे. आमच्या मुलावर अन्याय झाला तसा इतर पैलवानावर होऊ नये अशी अपेक्षाही सिकंरदच्या आई वडिलांनी व्यक्त केली. सेमीफायनलमध्ये मुलाचा पराभव झाल्यानंतर आई वडिलांनी रविवारी दिवसभर अन्नाचा कणही खाल्ला नव्हता. सिकंदरच्या खर्चाची जबाबदारी उचलणारे उद्योजक रमेश बारस्कर हेसुद्धा रविवारी दिवसभर त्याच्या घरी होते. हेही वाचा : Maharashtra Kesari: कोण आहे सिकंदर शेख? महाराष्ट्र केसरी हरला तरी होतेय पराभवाची चर्चा आक्षेप काय आहेत? महेंद्र गायकवाडने सिकंदरला बाहेरील टांग हा डाव टाकला. तो परफेक्ट नव्हता असं काहींचे म्हणणे असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. सिकंदर धोकादायक पोजिशनला नव्हता तरी महेंद्रला चार गुण कसे दिले गेले? असा प्रश्न विचारला जातोय. महेंद्रने टांग मारली तेव्हा सिकंदर पाठीवर पडला का? किंवा त्याचा खांदा मैदानावर टेकला का? यासारखे प्रश्न कुस्ती शौकिन विचारत आहेत. कोण आहे सिकंदर शेख? सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातला असलेला सिकंदर शेख हा यंदा महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याच्या पराभवानंतर कुस्ती शौकिनांनी पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय. सिकंदरने याआधी हिंदकेसरी जस्साभट्टीला चीतपट केलं होतं. तसंच उत्तर भारतात त्याला टायगर ऑफ महाराष्ट्र म्हणूनही ओळखलं जातं. राज्यासह देशभरात सिकंदरने अनेक कुस्त्यांची मैदाने जिंकली आहेत. आजोबांपासूनच कुस्तीचा वारसा मिळाला होता. वडीलांना गरिबीमुळे कुस्ती सोडून हमालीचं काम करावं लागलं होतं. सिकंदरने आतापर्यंत अनेक कुस्त्या जिंकून बक्षीसांची लयलूट केलीय. यात एक महिंद्रा थार, जॉन डिअर ट्रॅक्टर, चार आल्टो कार, २४ बुलेट, ६ टीव्हीएस, ६ स्प्लेंडर दुचाकी तर तब्बल ४० चांदीच्या गदा सिकंदरने पटकावल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.