नवी दिल्ली, 6 डिसेंबर: भारतीय संघाने सोमवारी अवघ्या 43 मिनिटांत न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडत दुसरी कसोटी (IND vs NZ Test Series)जिंकली. भारताने ठेवलेल्या 540 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव 167 धावांवर गडगडला. भारताने हा सामना 372 धावांनी जिंकला. या विजयानंतर भारताचे लक्ष आता दक्षिण अफ्रिकेवर असणार आहे. न्यूझीलंडनंतर आता भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतर्गत पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध(India vs South Africa) खेळायचा आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉन दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा करण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, या दौऱ्यावरील टी-20 मालिका रद्द करण्यात आली आहे. आता फक्त कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेच्या तारखांमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता पहिली कसोटी 17 डिसेंबरऐवजी 26 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (एजीएम) बीसीसीआयनेच याची घोषणा केली. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनेही तारखांमध्ये बदल झाल्याची पुष्टी केली आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) येत्या काही दिवसांत नवीन ठिकाण आणि नवीन वेळापत्रक जाहीर करेल. कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे हा दौरा बदलण्यात आला आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाईल आणि कोणताही निष्काळजीपणा केला जाणार नाही, असेही क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने म्हटले आहे. कोरोनाचा धोका पाहून सामन्याचे ठिकाणही ठरवले जाईल, जेणेकरून खेळाडूंना सुरक्षित वाटेल. यामध्ये कडक बायो-बबल बनवले जातील.
कोविड-19 च्या ओमिक्रॉन प्रकाराबद्दलच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने शनिवारी जाहीर केले की भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2021-22 साठी आयोजित केला जाईल. सुधारित तारीख आणि मार्गक्रमणासह पुढे जात आहे. मात्र या दौऱ्याबाबत अद्याप कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. या दौऱ्यावर टीम इंडिया कधी रवाना होणार याबाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे या दौऱ्यासाठी संघाची निवड अद्याप झालेली नाही.
पहिली कसोटी: 26-30 डिसेंबर, सेंच्युरियन
दुसरी कसोटी: 3-7 जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरी कसोटी: 11-15 जानेवारी, केपटाऊन
पहिली वनडे: जानेवारी, केपटाऊन
दुसरी वनडे: जानेवारी, केपटाऊन
तिसरी वनडे: जानेवारी, केपटाऊन
कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. नोव्हेंबरच्या मध्यात दररोज 200 रुग्णांची नोंद होत होती. भारताचा अ संघही सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.
भारत-अ आणि दक्षिण आफ्रिका-अ संघांदरम्यान तीन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळवली जात आहे. बीसीसीआयने भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला असता तर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे करोडो रुपयांचे नुकसान होऊ शकते. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे कार्यवाहक सीईओ फोलेत्सी मोसेकी यांनी दौरा सुरू ठेवल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team indian