हिसार, 17मार्च: हरियाणाच्या (Haryana) भूमीने भारताला असे अनेक खेळाडू दिले आहेत, ज्यांनी देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं. सायना नेहवाल (Saina Nehwal) त्यातलीच एक. हरियाणाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषप्रधान समाज म्हणजे काय असतं, हे तुम्ही इथल्या घराघरांत पाहू शकता. तिथे महिलांपेक्षा पुरुषांना जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे घरात मुलाचा जन्म झाला, तर उत्सव साजरा केला जातो, मुलगी झाल्यावर मात्र नाही. हिस्सारच्या जाट परिवारात सायनाचा जन्म झाला. तिच्या आजीलाही नातूच हवा होता. त्यामुळे सायनाचा जन्म झाल्यावर आजी इतकी खट्टू झाली होती, की महिनाभर तिने आपल्या या नातीचं तोंडही पाहिलं नव्हतं. कारण काय, तर ती मुलगी होती म्हणून...
बॅडमिंटनच्या माध्यमातून भारताचं नाव जगात झळकवणारी सायना नेहवाल (Saina Nehwal) हिचा आज 31वा वाढदिवस आहे. 17 मार्च 1990 रोजी जन्मलेल्या सायनाने बॅडमिंटनमध्ये असे अनेक विक्रम केले आहेत, की जे तिच्याआधी कोणाही भारतीय महिला खेळाडूने केले नव्हते.
सायना लहान होती तेव्हा तिला बॅडमिंटन (Badminton) खेळण्याची अजिबात इच्छा नव्हती. कराटे हा तिचा आवडता खेळ होता. कराटेच्या अनेक स्पर्धांमध्येही ती जिंकली होती. पण वयाच्या आठव्या वर्षी खूप मेहनत घेऊनही तिचं शरीर कराटेसाठी फिट होऊ शकलं नाही. त्यामुळे तिला नाईलाजाने कराटेचा नाद सोडून द्यावा लागला. त्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांचा आवडता असलेला बॅडमिंटनचा खेळ खेळण्यास सुरुवात केली.
- सायनाचा जन्म हरियाणात हिसारमध्ये (Hissar) झाला; पण ती वाढली हैदराबादमध्ये...
- सायनाचे आई-वडील दोघेही राज्य पातळीवरचे बॅडमिंटन चॅम्पियन होते.
- बॅडमिंटन शिकण्यासाठी सायनाने कोर्टवर 16-16 तास कसून सराव करून घाम गाळला आहे.
- सायनाला बॅडमिंटन शिकवण्यासाठी तिचे वडील आपला अर्धा पगार तिच्या ट्रेनिंगसाठी खर्च करत होते.
- सायना बॅडमिंटनची प्रॅक्टिस जिथे करायची, ते स्टेडियम त्यांच्या घरापासून 25 किलोमीटरवर होतं. त्यामुळे तिचे वडील तिला रोज पहाटे चार वाजता स्कूटरवरून तिथे नेऊन सोडायचे. अनेकदा सायना स्कूटरवर वडिलांच्या मागे बसलेली असताना झोपायचीही.
- कोणतीही दुर्घटना घडू नये, याची काळजी घेण्यासाठी नंतर सायनाची आईही तिच्याबरोबर जायला लागली. स्टेडियमवर दोन तास प्रॅक्टिस करून मग सायना शाळेत जाई.
देशातले नामवंत खेळाडू एस. एम. आरिफ यांच्याकडून सायनाने काही काळ प्रशिक्षण घेतलं. आरिफ यांना द्रोणाचार्य पुरस्कारही मिळाला आहे. त्यानंतर सायनाने हैदराबादमध्ये (Hyderabad) पुलेला गोपीचंद अॅकॅडमीत प्रवेश घेतला आणि ती पी. गोपीचंद (P. Gopichand) यांच्याकडून प्रशिक्षण घेऊ लागली. त्यांनाच ती आपले मेंटॉर मानते.
(हे वाचा: बुमराहला लग्नाच्या शुभेच्छा देताना मयंकची मोठी चूक, संजनाला टॅग करण्याऐवजी...)
सायना भारतातली सर्वांत यशस्वी खेळाडू म्हणून ओळखली जाते. जगातल्या नंबर वन बॅडमिंटनपटूचा किताबही तिने मिळवला होता. 23हून अधिक आंतरराष्ट्रीय विजेतेपदं तिच्या खात्यात आहेत. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनसाठी पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. पद्मभूषण पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं असून, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आदी मानाचे पुरस्कारही तिला मिळाले आहेत. आज ती स्टार सेलिब्रिटी खेळाडू असून, लोकप्रियतेच्या बाबतीत विराट कोहलीपेक्षा कमी नाही. मॅगझिन्सच्या कव्हर पेजवरही ती दिसते आणि अनेक ब्रँड्सची अॅम्बेसेडरही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Haryana, India, Saina Nehwal ., Sayana nehwal, Sports