मुंबई, 13 जानेवारी : भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजा हा गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त आहे. यामुळे भारतीय संघात ही त्याची निवड झालेली नाही. आशिया कप २०२२ पासून तो भारतीय संघात दिसलेला नाही. सध्याच्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही त्याची निवड झाली नाही. आता भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिले दोन सामने जिंकून मालिका विजय साजरा केला. दरम्यान, या विजयानंतर रविंद्र जडेजाने केलेल्या पाच शब्दांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. रविंद्र जडेजा गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर दुखापतीतून सावरत आहे. त्यानं संघात पुनरागमन करण्यासाठी तयारी सुरू केली असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरावही करत आहे. या दुखापतीमुळे जडेजाला टी२० वर्ल्ड कपला मुकावे लागले होते. तर बांगलादेशविरुद्ध कसोटी संघात त्याला स्थान मिळालं होतं. पण पूर्ण तंदुरुस्त नसल्यानं त्याला वगळण्यात आले.
ट्विटरवर रविंद्र जडेजाने काही बोलू नका, फक्त हसा असं पाच शब्दांत ट्विट केलं आहे. या ट्विटसोबत जडेजाने एक स्मितहास्य करणारा इमोजीसुद्धा पोस्ट केला आहे. जडेजाच्या या ट्विटचा अर्थ नेटकरी वेगवेगळा लावत आहेत. काहींनी जडेजाने हे ट्विट निवड समितीवर टीका करण्यासाठी केल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा : चक दे, गुड लक; भारताच्या क्रिकेटपटूंनी हॉकी संघाला दिल्या शुभेच्छा श्रीलंकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्या मालिकेत तरी जडेजाला संधी मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित होतोय. अद्याप निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही. तर दुसरीकडे जडेजाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या अक्षर पटेलने चांगली कामगिरी केलीय. त्यामुळे जडेजासाठी आता संघात जागा मिळवणं आव्हान असणार आहे.