मुंबई, 30 जानेवारी : भारताचा क्रिकेटपटू मुरली विजय याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ट्विट करून एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले आहे.
मुरली विजय याने 2002 मध्ये क्रिकेट विश्वात पदार्पण केले. तो सुरुवातीला तामिळनाडू राज्याच्या संघातून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळायचा. त्यानंतर त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. विजयने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मुरलीने 61 कसोटी, 17 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
@BCCI @TNCACricket @IPL @ChennaiIPL pic.twitter.com/ri8CCPzzWK
— Murali Vijay (@mvj888) January 30, 2023
निवृत्ती जाहीर करताना आपण यापुढे परदेशी लीगमध्ये नशीब आजमावणार असल्याचे मुरली विजयने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मुरली विजयने 61 कसोटीत 3982 धावा, 17 एकदिवसीय सामन्यात 339 धावा आणि 9 टी-20 सामन्यात 169 धावा केल्या आहेत. तर, कसोटी सामन्यात 12 शतके झळकावली आहेत.
विजयची सर्वोच्च धावसंख्या 167 होती. त्याने कसोटीत 15 अर्धशतकेही केली आहेत. मात्र, वनडे आणि टी-20 मध्ये मुरलीला हवे तसे यश मिळवता आले नाही. भारतीय संघाकडून खेळताना त्याने अनेकदा सलामीवीर फलंदाज म्हणून कामगिरी बजावली आहे. क्रिकेटपटू मुरली विजय याने दिनेश कार्तिकच्या पूर्व पत्नीशी लग्न केल्यानंतर तो अधिक चर्चेत आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news