मुंबई, 7 जानेवारी : सध्या भारतीय क्रिकेटपटू खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यात आध्यात्मिकतेकडे वळताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली सपत्नीक ऋषिकेश येथे गेला होता. तेथे त्याने पंतप्रधान मोदींचे गुरु ब्रह्मलीन दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात जाऊन दर्शन घेतले. तर महेंद्र सिंह धोनी याने देखील काही दिवसांपूर्वी झारखंड येथील एका प्रसिद्ध मंदिराला भेट दिली होती. आता विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय क्रिकेटर दीपक चहर हा देखील आध्यात्मिकतेकडे वळला आहे. दीपक चहर आणि त्याची पत्नी जया हे दोघे सध्या ऋषिकेश येथे आध्यात्मिक यात्रा करीत आहेत. दीपक चहर याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तो गंगा नदीत डुबकी मारून स्नान करताना दिसत आहे.
दीपक चहर आणि त्याची पत्नी जया हे दोघे नदी किनारी पूजा देखील करीत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच हे दोघे नदी काठी व्यायाम देखील करत असतानाच व्हिडीओ चहरने पोस्ट केला आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू दीपक चहर याला मागील वर्षी ऑस्ट्रेलियात खेळवल्या गेलेल्या टी 20 वर्ल्ड कपपूर्वी दुखापत झाली होती. त्यानंतर अजूनही तो भारतीय संघात परतू शकला नाही.
काही दिवसांपूर्वी दीपक चहर याच्या पत्नीने आपल्यासोबत 10 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अधिकारी असलेले ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांनी दीपक चहरची पत्नी जयासोबत करार केला होता. या करारानुसार, 7 ऑक्टोबर 2022 रोजी जयाकडून 10 लाख रुपये घेतले होते. परंतु अद्याप ते परत दिले नाहीत. पैशाची मागणी केल्यावर जयाला संबंधित व्यक्तींकडून शिवीगाळ करण्यात आली आणि जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप जयाने केला होता.