सिल्हेट-बांगलादेश, 12 ऑक्टोबर: भारतीय महिला संघाचा यंदाच्या आशिया कपमधला प्रवास आतापार्यंत सोपा ठरलाय. आणि आता सेमी फायनलमध्येही हरमनप्रीतच्या वुमन ब्रिगेडसमोर दुबळ्या थायलंडचं आव्हान असणार आहे. या दोन्ही संघातला साखळी फेरीतला सामना एकतर्फी ठरला होता. ज्यात टीम इंडियानं थायलंडला अवघ्या 37 धावात ऑल आऊट केलं होतं आणि 9 विकेट्सनी ही मॅच जिंकली होती. पण सेमीफायनलमध्ये थायलंडची टीम आधीपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरेल. याच टीमनं पाकिस्तानला साखळी फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. आणि त्यानंतर गतविजेत्या बांगलादेशला हरवून आशिया कपची सेमी फायनल गाठली. भारतीय संघाला आपली बेंच स्ट्रेन्थ पारखून घेण्याची ही चांगली संधी आहे.
भारताकडून अनेक प्रयोग
आगामी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघानं आशिया कपच्या साखळी फेरीतदरम्यान अनेक प्रयोग केले. भारतानं साखळी फेरीत सहापैकी पाच सामने जिंकले. पण पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतानं गमावला. एका चांगल्या फिनिशरच्या शोधात असलेल्या टीम इंडियानं किरण नवगिरे आणि हेमलता यांना संधी दिली. पण फायनलच्या दृष्टीनं थायलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया एक मजबूत टीम मैदानात उतरवेल अशी शक्यता आहे. याधीच्या सामन्यात अनुभवी दिप्ती शर्मा, स्नेह राणा, राजेश्वरी गायकवाड यांचं आक्रमण प्रभावी ठरलं होतं.
जेमिमा फॉर्मात
भारताची मधल्या फळीतली फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स फुल फॉर्मात आहे. जेमिमानं स्पर्धेत दोन अर्धशतकांसह 188 धावा केल्या आहेत. जेमिमासह पहिल्या दोन मॅचमध्ये अपयशी ठरलेली शफाली वर्माही पुन्हा फॉर्मात आली आहे.
हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियाचा 'फन डे', पाहा तुमचे आवडते क्रिकेटर्स ऑस्ट्रेलियात काय करतायत? Video
श्रीलंका-पाकिस्तान दुसरी सेमी फायनल
दरम्यान टीम इंडिया आणि थायलंड यांच्यातल्या पहिल्या सेमी फायनलनंतर पाकिस्तान आणि श्रीलंका संघात दुसरी सेमी फायनल होणार आहे. भारत-थायलंड सामना सकाळी 9 वाजता तर दुसरा सामना दुपारी 1.00 वाजता सुरु होईल.
भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, एस. मेघना, रिचा घोष, स्नेह राणा, डायलन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि किरण नवगिरे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports, Women's cricket Asia Cup