कोलंबो, 26 जुलै : श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाचा मधल्या फळीतला बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वनडे सीरिजमध्ये मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावल्यानंतर पहिल्या टी-20 मध्येही (India vs Sri Lanka T20) सूर्याने धमाकेदार बॅटिंग केली. फक्त 34 बॉलमध्ये त्याने 50 रन केले, यामध्ये 5 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. सूर्यकुमारच्या या खेळीमुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 164 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा 126 रनवर ऑल आऊट झाला, यामुळे भारताने हा सामना 36 रनने जिंकला. पहिल्या सामन्यात सूर्यकुमारने उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी त्याच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खानने (Zaheer Khan) दिली आहे. या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या सूर्यकुमार यादवला मॅन ऑफ द मॅच द्यायला पाहिजे होतं, असं मत झहीर खानने मांडलं. तो क्रिकबझशी बोलत होता. भुवनेश्वर कुमारने 22 रन देऊन 4 विकेट घेतल्या, म्हणून त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. ‘सूर्यकुमार यादवचा या सामन्यात मॅन ऑफ द मॅच मिळवण्याचा हक्क होता, कारण त्याने कठीण खेळपट्टीवर चांगल्या रन रेटने बॅटिंग केली. आपल्या इनिंगमध्ये त्याने 5 फोर आणि 2 सिक्स मारल्या, तसंच त्याने 18 रन धावून काढल्या. या सामन्यात त्याने कमी डॉट बॉल खेळले, म्हणून त्याला मॅन ऑफ द मॅच मिळालायला पाहिजे होतं,’ असं झहीर म्हणाला. श्रीलंकेच्या खेळाडूंना सूर्यकुमारकडून रन कशा करायच्या ते शिकलं पाहिजे, असं वक्तव्य झहीरने केलं. वनडे सीरिजमध्ये श्रीलंकन बॅट्समननी चांगले शॉट खेळले, पण एक-एक, दोन-दोन रन काढण्यात त्यांना अपयश आलं, ज्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढला, अशी प्रतिक्रिया झहीरने दिली. वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवची आता भारताच्या टेस्ट टीममध्येही निवड झाली आहे. श्रीलंकेची सीरिज संपली की सूर्यकुमार आणि पृथ्वी शॉ इंग्लंडला रवाना होणार आहेत. इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे या दोघांना इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवने 77 मॅचच्या 129 इनिंगमध्ये 44 च्या सरासरीने 5,326 रन केले, यामध्ये 14 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 200 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.