केपटाऊन, 10 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 3 टेस्ट मॅचची सीरिज (India vs South Africa) सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, तर जोहान्सबर्ग टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने जोरदार पुनरागमन केलं. टीम इंडियासाठी बॅटिंगबरोबरच बॉलर्सचा फॉर्मही चिंतेचा विषय आहे, यात जसप्रीत बुमराहचाही (Jasprit Bumrah) समावेश आहे. बुमराहने 3 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्येच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण या दौऱ्यात तो इतका प्रभावी दिसत नाही. बुमराहचा फॉर्म आणि टीमच्या जय-पराजयाचं थेट कनेक्शन आहे. सेंच्युरियन टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये मिळून बुमराहने 5 विकेट घेतल्या होत्या, ज्यात टीम इंडियाचा विजय झाला. पण जोहान्सबर्गमध्ये त्याने 119 रन देऊन फक्त एक विकेट मिळवली, ज्यामुळे पहिल्यांदाच भारताचा जोहान्सबर्गच्या मैदानात पराभव झाला. बुमराहचा फॉर्म यासाठीही चिंतेचा विषय आहे, कारण दोन्ही टेस्टच्या खेळपट्टी फास्ट बॉलरना अनुकूल होत्या, तरीही बुमराहला चमकदार कामगिरी करता आली नाही. जोहान्सबर्ग टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 21 ओव्हर आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 17 ओव्हर बॉलिंग केली, म्हणजेच मॅचमध्ये त्याने 38 ओव्हर टाकल्या आणि त्याला फक्त एकच विकेट मिळाली. या खेळपट्टीवर गेलेल्या 33 पैकी 32 विकेट फास्ट बॉलरना मिळाल्या. बुमराहची आकडेवारी बघितली तर तो प्रत्येक 50 बॉलला एक विकेट घेतो, त्यामुळे जोहान्सबर्गची आकडेवारी बघितली तर त्याची कामगिरी नक्कीच निराशाजनक झाली आहे. बुमराहच्या बॉलिंगची धार बोथट व्हायचं कारण त्याच्या पाठीची दुखापतही आहे. स्ट्रेस फ्रॅक्चरनंतर फेब्रुवारी 2020 साली त्याने मैदानात पुनरागमन केलं. यानंतर तो बॅटिंग टीमसाठी धोकादायक ठरत नाहीये, असं चित्र आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या आकडेवारीनुसार बुमराह 26 टक्के शॉर्ट पिच बॉलवर कोणत्याही टीमच्या टॉप-7 बॅटरना चुकीचा शॉट खेळण्यासाठी मजबूर करायचा, पण पुनरागमनानंतर हीच टक्केवारी 17 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये बुमराहने 101 शॉर्ट पिच बॉल टाकले, यातले फक्त 20 बॉल खेळताना खेळाडूंना अडचणीचा सामना करावा लागला. बुमराहने आतापर्यंत 107 पैकी 34 विकेट शॉर्ट पिच बॉलवर घेतल्या आहेत. जानेवारी 2020 आधी त्याने शॉर्ट पिच बॉलिंगवर टेस्टमध्ये 17 विकेट घेतल्या होत्या, तेव्हा त्याची सरासरी 18.1 आणि स्ट्राईक रेट 46.2 एवढा होता. जानेवारी 2020 नंतर त्याची शॉर्ट पिच बॉलिंगवर विकेट घेण्याची सरासरी 42.2 आणि स्ट्राईक रेट 100 पेक्षा जास्त झाला. दुखापतीआधी खेळाडूंनी 107 शॉर्ट पिच बॉलवर बुमराहला शॉट मारण्याचा प्रयत्न केला, यातले फक्त 52.3 टक्के खेळाडू नियंत्रणात होते. पुनरागमनानंतर बुमराहच्या बॉलिंगवर 106 शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला, यातले 71 टक्के बॅटर शॉटच्या नियंत्रणात होते. शॉर्ट पिच बॉलिंगच नाही तर फूल आणि गुड लेंथ बॉलिंगवरही बॅटरना बुमराहचा सामना करताना फारशा अडचणींचा सामना करावा लागत नाहीये. दुखापतीआधी बुमराहने फूल लेंथ बॉलिंगने 20.4 ची सरासरी आणि 46.4 च्या स्ट्राईक रेटने 30 टॉप ऑर्डर बॅटरना आऊट केलं. तर दुखापतीनंतर त्याची सरासरी 31.9 आणि स्ट्राईक रेट 67 झाला. यादरम्यान त्याला 23 विकेट मिळाल्या. या आकड्यांवरून बुमराहची दुखापतीनंतर बॉलिंगची धार कमी झाली असंच म्हणावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.