चेन्नई, 13 फेब्रुवारी : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा फॉर्मसाठीचा संघर्ष सुरूच आहे. इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये विराट शून्य रनवर आऊट झाला. मोईन अली (Moeen Ali)ने विराटला माघारी धाडलं. बोल्ड झाल्यानंतर विराट कोहलीही धक्क्यात होता, आपण बोल्ड झाल्यावर विराटचा विश्वास नव्हता. विकेट कीपरचा हात स्टम्पला लागल्याचं विराटला वाटलं. अखेर अंपायरने थर्ड अंपायरला विचारलं, तेव्हा विराट आऊट झाल्याचं स्पष्ट झालं. 5 बॉलमध्ये शून्य रन करून विराट आऊट झाला. मागच्या वर्षभरापासून विराटचा फॉर्मसाठीचा संघर्ष सुरूच आहे. 2020 पासून विराटला क्रिकेटच्या कोणत्याच फॉरमॅटमध्ये शतक करता आलेलं नाही.
Enough said. Kohli out! #INDvsENG pic.twitter.com/cI7mMqfD4t
— Danny Lee (@AirEVthingTRNSP) February 13, 2021
याआधी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 227 रनने पराभव झाला होता. इंग्लंडचा भारतीय भूमीवरचा सगळ्यात मोठा विजय होता, तसंच भारताने 22 वर्षानंतर पहिल्यांदाच चेन्नईमध्ये टेस्ट मॅच गमावली. चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये आता इंग्लंड 1-0 ने पुढे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship Final) प्रवेश मिळवण्यासाठी आता भारताला फक्त दुसरी टेस्टच नाही, तर सीरिजही जिंकावी लागणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्येही जर भारताचा पराभव झाला, तर विराटचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळण्याचं स्वप्न भंगेल. 18 ते 22 जूनदरम्यान लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. न्यूझीलंडची टीम आधीच या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा आहे. वैयक्तिक फॉर्मसोबतच विराटच्या कॅप्टन्सीवरही गेल्या काही दिवसांपासून टीका होत आहे. विराटच्या नेतृत्वात भारताला मागच्या चारही टेस्टमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.