अहमदाबाद, 19 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 मध्ये (India vs England) पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॅटिंगची संधी मिळालेल्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) खणखणीत अर्धशतक केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली पहिलीच रन सूर्यकुमारने सिक्स मारून केली. या अर्धशतकी खेळीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच टॉस हरलेल्या टीमने मॅचमध्ये विजय मिळवला.
मॅचनंतर सूर्यकुमारने विराट कोहलीसोबत (Virat Kohli) काय चर्चा झाली, याचं उत्तर दिलं. 'या कामगिरीमुळे मी खूश आहे. भारतासाठी खेळून टीमला मॅच जिंकवून द्यायचं स्वप्न मी कायमच बघितलं होतं. आयपीएलमध्ये जसं खेळतोस, तसंच इकडेही खेळ, कारण फक्त कपड्यांचाच फरक आहे, असं विराट आणि टीम प्रशासनाने मला सांगितलं होतं,' असं सूर्या म्हणाला.
तर दुसरीकडे विराट कोहलीनेही सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं आहे. 'उत्कृष्ट टीमविरोधात ही मॅच होती. मैदानात धुकंही खूप होतं. आमचं लक्ष्य 180 पर्यंत पोहोचणं होतं. सूर्यकुमारची खेळी बघून आम्ही हैराण होतो. अचानक तिसऱ्या क्रमांकावर येऊन अशी खेळी करणं सोपं नाही. सूर्याची ही इनिंग खास होती. संधी मिळताच हे युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करत आहेत. आमचे खेळाडू विश्वास घेऊन आयपीएलमध्ये जाऊ इच्छितात,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
अर्धशतकी खेळीमुळे सूर्यकुमार यादव शेवटच्या टी-20 मध्येही खेळेल, हे निश्चित मानलं जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही त्याची निवड झाली आहे. अशाच पद्धतीने त्याने कामगिरी केली, तर त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्येही निवड होईल.
सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे भारताने चौथ्या टी-20 मध्ये इंग्लंडचा 8 रनने पराभव केला आणि 5 मॅचच्या सीरिजमध्ये 2-2 ने बरोबरी केली. सूर्यकुमार यादवने 31 बॉलमध्ये 57 रन केले, यात 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Sports, Suryakumar yadav, Virat kohli