मुंबई, 2 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली टेस्ट सीरिज संपल्यानंतर दोन्ही टीम 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहेत. टी-20 सीरिजसाठी भारतीय टीमची निवड झाली आहे, तर वनडे सीरिजच्या टीमची अजून घोषणा व्हायची आहे. त्यामुळे वनडे सीरिजमधून रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे. रोहित शर्मा कोरोना यायच्या आधीपासून क्रिकेट खेळत आहे. रोहित मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतातली वनडे सीरिज, त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात 5 टी-20 मॅच, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळला. यानंतर दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी-20 सीरिज खेळला नाही. पण शेवटच्या दोन टेस्टसाठी तो मैदानात उतरला. आता तो इंग्लंडविरुद्ध 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे.
एवढा काळ बायो-बबलमध्ये राहणं मानसिकदृष्ट्या थकवणारं आहे, त्यामुळे रोहितला वनडे सीरिजमधून आराम दिला जाऊ शकतो. वनडे सीरिजमध्ये शिखर धवन ओपनर म्हणून खेळेल, हे जवळपास निश्चित आहे. पण रोहित नसेल तर मग दुसरा ओपनर म्हणून संधी मिळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्याचं रेकॉर्ड बघितलं तर कर्नाटकचा ओपनर देवदत्त पड्डिकल (Devdutt Padikkal) या भूमिकेत फिट बसतो. मागच्या दोन वर्षांपासून तो स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक रन केले आहेत. आतापर्यंतच्या 5 मॅचमध्ये त्याने 190 पेक्षा जास्तच्या सरासरीने 572 रन केले आहेत. यातल्या प्रत्येक मॅचमध्ये त्याने 50 पेक्षा जास्त स्कोअर केला आहे. मागच्या तिन्ही मॅचमध्ये पडिक्कलने शतकी खेळी केली आहे. ओडिसाविरुद्धच्या स्पर्धेत पडिक्कलने त्याच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम 152 रनची खेळी केली. हा फॉर्म बघता रोहित जर खेळणार नसेल, तर पडिक्कलचं नाव आघाडीवर आहे.
दोन वर्षांपूर्वीही विजय हजारे ट्रॉफीमध्ये पडिक्कल सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. 2019-20 मोसमात त्याने 11 मॅचमध्ये 609 रन केले होते. यात पाच अर्धशतकं आणि दोन शतकांचा समावेश होता. पडिक्कलच्या या कामगिरीमुळेच कर्नाटकने फायनलमध्ये तामीळनाडूचा पराभव केला होता.
त्याच वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतही (Syed Mushtaq Ali t-20 Trophy) पडिक्कलने मोलाची भूमिका बजावली होती. 12 मॅचमध्ये त्याने 64.44 च्या सरासरीने सर्वाधिक 580 रन केले होते. या स्पर्धेत त्याने एक शतक आणि पाच अर्धशतकं केली होती. त्या मोसमात सर्वाधिक 33 सिक्सही त्यानेच लगावल्या होत्या. पडिक्कलमुळे कर्नाटकने विजय हजारे ट्रॉफीसोबतच सय्यद मुश्ताक अली स्पर्धाही जिंकली होती.
यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत पडिक्कलने 43.60 च्या सरासरीने 218 रन केले. या स्पर्धत कर्नाटककडून त्याने सर्वाधिक रन बनवले. फक्त वनडे आणि टी-20 स्पर्धाच नाही तर क्रिकेटच्या सगळ्या मोठ्या फॉरमॅटमध्येही पडिक्कलने अशीच कामगिरी केली. 2019-20 साली रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) त्याने कर्नाटककडून सर्वाधिक रन केले. 10 मॅचमध्ये त्याने 40 पेक्षा जास्तच्या सरासरीने 649 रन बनवले, यात 7 पेक्षा जास्त वेळा त्याने 50 रनपेक्षा जास्तचा स्कोअर ओलांडला. मागच्या दोन वर्षातली ही कामगिरी बघता पडिक्कलला वनडे टीममध्ये संधी मिळू शकते.
आयपीएलमध्ये देवदत्त पडिक्कल विराट कोहलीच्या बँगलोरकडून खेळतो, त्यामुळे विराटलाही त्याचा खेळ माहिती आहे. मागच्या आयपीएलमध्येही पडिक्कलने धडाकेबाज कामगिरी केली होती. 15 मॅचमध्ये पडिक्कलने 473 रन केले होते. पडिक्कलच्या बॅटिंगमुळेच मागच्यावर्षी बँगलोरची टीम क्वालिफायरमध्ये पोहोचली होती. या मोसमाआधी बँगलोरने एरॉन फिंचला सोडून दिलं आहे. त्यामुळे पडिक्कल आयपीएलमध्येही विराटसोबत ओपनिंगला खेळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Rohit sharma