लॉर्ड्स, 14 ऑगस्ट : टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन केएल राहुलनं (KL Rahul) खराब फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांचा बचाव केला आहे. हे दोघंही जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याकडे मोठा अनुभव असून रन बनवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना माहिती आहे,' असं राहुलनं सांगितलं.
पुजारा आणि टेस्ट टीमचा उपकर्णधार रहाणे यांची कामगिरी गेल्या काही दिवसांपासून निराशाजनक झाली आहे. यावर्षी त्यांची सरासरी 20 च्या आसपास आहे. इंग्लंड विरुद्ध सध्या सुरु असलेल्या मालिकेत पुजारानं 4, नाबाद 12 आणि 9 रन काढले आहेत. तर राहाणेनं दोन इनिंगमध्ये 5 आणि एक रनचं योगदान दिलं आहे.
राहुलनं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितलं की, 'पुजारा आणि अजिंक्यनं अनेकदा भारतीय टीम अडचणीत असताना चांगली कामगिरी केली आहे. ते दोघंही वर्ल्ड क्लास क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे त्यांना यामधून कसं बाहेर पडायचं हे माहिती आहे.
इंग्लंडमध्ये बॅटींग करणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. तुम्हाला इथं प्रत्येक इनिंगमध्ये रन काढता येत नाहीत. पण जर तुम्हाला चांगली सुरुवात मिळाली तर त्याचा फायदा उठवावा लागेल.' राहुलनं लॉर्ड्स टेस्टमध्ये शतक झळकावले. तो 129 रन काढून आऊट झाला. पण, या खेळीचं मोठ्या शतकात रुपांतर करता न आल्याबद्दल राहुलनं निराशा व्यक्त केली.
वर्ल्ड कप विजेता भारतीय कॅप्टन अमेरिकेत क्रिकेट खेळणार! अमेरिकन टीमशी केला करार
गावसकरांचाही पाठिंबा
टीम इंडियाचे महान खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी देखील रहाणे आणि पुजाराला पाठिंबा दिला आहे. फक्त रहाणे आणि पुजाराच नाही तर दुसरे बॅट्समनही अपयशी ठरले आहेत, असं स्पष्ट मत गावसकरांनी मांडलं आहे.
सोनी स्पोर्ट्ससोबत बोलताना गावसकर म्हणाले, 'हे दोन्ही खेळाडू लो प्रोफाईल आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर त्यांना टीममधून बाहेर केलं तरीही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (WTC Final) रहाणेने भारताकडून सर्वाधिक 49 रन केले, दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला रन करता आले नाहीत. या खेळाडूंबाबतच प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण ते दोघंही लो प्रोफाईल आहेत, त्यांना बाहेर केलं तरी कोणी गोंधळ करणार नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england