Home /News /sport /

IND vs AUS : 'तुला परत मानलं रे ठाकूर', शार्दुलच्या बॅटिंगवर विराटची मराठमोळी प्रतिक्रिया

IND vs AUS : 'तुला परत मानलं रे ठाकूर', शार्दुलच्या बॅटिंगवर विराटची मराठमोळी प्रतिक्रिया

शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या या बॅटिंगवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मराठमोळी प्रतिक्रिया दिली आहे.

  ब्रिस्बेन, 17 जानेवारी : शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अफलातून बॅटिंग करत ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताला कमबॅक करून दिलं आहे. भारताची अवस्था 186/6 अशी झालेली असताना या दोघांनी 123 रनची पार्टनरशीप केली. शार्दुल ठाकूरने 115 बॉलमध्ये 67 रन केले, तर वॉशिंग्टन सुंदर 62 रन करून आऊट झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 369 रन केल्यानंतर भारताचा डाव 336 रनवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाला या इनिंगमध्ये 33 रनची आघाडी मिळाली असली, तरी भारताने मात्र धमाकेदार पुनरागमन केलं आहे. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या या बॅटिंगवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मराठमोळी प्रतिक्रिया दिली आहे. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरची उत्कृष्ठ खेळी. हेच टेस्ट क्रिकेट आहे. पदार्पणाच्या टेस्टमध्येच वॉशिंग्टनने संयमी खेळी केली. शार्दुल तुला परत मानलं रे, असं ट्विट विराटने केलं आहे.

  '2019 सालीही तुला मानलं रे ठाकूर'

  2019 सालीही वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मॅचनंतर विराटने तुला मानलं रे ठाकूर असंच ट्विट केलं होतं. वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 316 रनचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या काही ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने हा सामना 4 विकेट राखून जिंकला होता. शार्दुलने त्या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये दोन फोर आणि एका सिक्सच्या मदतीने 17 रन केले होते.

  पालघरच्या शार्दुल ठाकूरचं जगभरात कौतुक, पाहा कोण काय म्हणाले

   शार्दुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरनी शार्दुल ठाकूरला बाऊन्सर टाकले, पण शार्दुल अजिबात डगमगला नाही, उलट त्याने कांगारूंच्या या बाऊन्सरवर सिक्स मारून प्रत्युत्तर दिलं. मुंबईच्या पालघरचा रहिवासी असणाऱ्या शार्दुल ठाकूरला या मॅचमध्ये खेळाडूंच्या दुखापतींमुळे संधी मिळाली. या संधीचं शार्दुलने सोनं केलं. बॉलिंगमध्येही त्याने ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंना माघारी पाठवलं.

  शार्दुल ठाकूरच्या या खेळीचं माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट रसिकांनी कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी याने शार्दुलच्या कव्हर ड्राईव्हची तुलना स्टीव्ह वॉच्या कव्हर ड्राईव्हशी केली आहे. तर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर शार्दुलचा उल्लेख मुंबईच्या खडूस शाळेचा खेळाडू, असा करण्यात आला आहे. तर एका चाहत्याने शार्दुल ठाकूरचा मुंबईच्या ट्रेनने प्रवास करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. भारताने दाखवलेल्या धैर्याला दबंगशिवाय कोणताही शब्द नाही. अतिसुंदर ठाकूर, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली, तर हर्षा भोगले यांनीही सुंदर-शार्दुलची ही खेळी भारताने ऑस्ट्रेलियात कशी लढत दिली, त्याचं उदाहरण असल्याचं सांगितलं.
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Breaking News, India vs Australia

  पुढील बातम्या