मुंबई, 15 जून : आयर्लंड दौऱ्यातल्या 2 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची (India tour of Ireland) निवड करण्यात आली आहे. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्सना (Gujarat Titans) चॅम्पियन करणाऱ्या हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजू सॅमसन (Sanju Samson) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. तर आयपीएलमध्ये धमाका करणाऱ्या राहुल त्रिपाठीची (Rahul Tripathi) पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे. आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळणारा राहुल त्रिपाठी प्रथम श्रेणी क्रिकेट महाराष्ट्राकडून खेळतो. राहुल त्रिपाठीसोबतच महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यानेही त्याचं टीम इंडियातलं स्थान कायम ठेवलं आहे. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दोन क्रिकेटपटूंची टीम इंडियात निवड झाली आहे. याआधी ऋषिकेश कानेटकर, अभिजीत काळे आणि केदार जाधव हे तीन क्रिकेटपटू महाराष्ट्राकडून वनडे क्रिकेट खेळले होते. महाराष्ट्राचे चंदू बोर्डे आणि वसंत रांजणे हे दोन क्रिकेटपटू एकाच वेळी टेस्ट क्रिकेट खेळले होते. तर भारताचे पहिले विकेट कीपर असलेले जनार्दन नवले महाराष्ट्राचेच होते. महाराष्ट्राचे असलेले नाना जोशीही भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळले आहेत, पण एकाच वेळी महाराष्ट्राच्या दोन क्रिकेटपटूंची निवड झालेली ही दूर्मिळ घटना आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.