मुंबई 25 जुलै : अक्षर पटेलच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना 2 गडी राखून जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 312 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. श्रेयस अय्यर, संजू सॅमसनच्या अर्धशतकानंतर अक्षराच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर टीम इंडियाने लक्ष्य गाठले. यासह भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने कॅरेबियन संघाचा सलग 12व्या मालिकेत पराभव केला आहे. 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करणाऱ्या अक्षर पटेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अक्षरशिवाय श्रेयस अय्यरने 63 आणि संजू सॅमसनने 54 धावा केल्या. 100 वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होपने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने कायले मेयर्ससह 65 धावांची भागीदारी केली. त्यानंतर होपने शामार्ह ब्रुक्ससह 62 धावांची आणि कर्णधार निकोलस पूरनसह 117 धावा जोडल्या. पूरन 77 चेंडूंत 1 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 74 धावांवर त्रिफळाचीत झाला. होपने त्यानंतर षटकार खेचून शतक पूर्ण केल. 100 व्या वन डे सामन्यात शतक झळकावणारा होप हा जगातील दहावा आणि विंडीजचा चौथा फलंदाज ठरला आहे. सलामीवीर शे होपने 135 चेंडूत 115 धावांची खेळी केली. 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला काही वेळातच मोठा झटका बसला. कर्णधार शिखर 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर गिल आणि अय्यरने डाव सावरला, पण 43 धावा करुन गिलही बाद झाला. मग सूर्यकुमार (9) स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. 63 धावा करुन अय्यर बाद झाला, पण संजूने झुंज कायम ठेवली. मात्र 54 धावा करुन तोही बाद झाला. भारताची स्थिती बिकट झाली असताना दीपक हुडाने अक्षर पटेलसोबत मोर्चा सांभाळला. दोघांनी फटकेबाजी सुरु केली. पण तितक्यात 33 धावा करुन हुडा बाद झाला. अक्षरच्या खांद्यावर सर्व सामना येऊन ठेपला. त्याच वेळी त्याने अगदी अप्रतिम कामगिरी करत संयमी अर्धशतक ठोकलं. कारकिर्दीतील पहिलं वहिलं एकदिवसीय अर्धशतक ठोकत त्याने सामना भारताला जिंकवून दिला. 35 चेंडूत 3 चौकार तर 5 षटकार ठोकत अक्षरने नाबाद 64 धावा केल्या. यावेळी अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत अक्षरने विजय पक्का केला. अक्षरलाच सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.