मुंबई, 12 जुलै : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून आजपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना डोमिनिकातील विंडसर पार्क मैदानात होणार आहे. या सामन्यात भारताकडून यशस्वी जैस्वाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी याची माहिती दिली. रोहित शर्माने कसोटी मालिका सुरू होण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत यशस्वी जैस्वाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार असल्याचं सांगितलं. २१ वर्षांचा यशस्वी जैस्वाल रोहित शर्मासोबत सलामीला खेळणार आहे. तर यशस्वी सलामीला उतरणार असल्याने स्टार फलंदाज शुभमन गिल तिसऱ्या नंबरवर खेळणार आहे. आतापर्यंत रोहित शर्मासोबत अनेक सामन्यात शुभमन गिल सलामीला आला आहे. धाराशिवमध्ये रंगणार 65वी महाराष्ट्र केसरी; चांदीची गदा, स्कॉर्पिओ, बुलेटसह बक्षिसांचा वर्षाव वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्यात दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराला वगळलं. तर यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड यांसारख्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. भारतीय संघाची घोषणा झाल्यापासून यशस्वी जैस्वालचे कसोटीत पदार्पण होणार अशी चर्चा होती. यशस्वी जैस्वालला चेतेश्वर पुजाराच्या जागी खेळवण्यात येईल असं म्हटलं जात होतं. पण त्याला सलामीला संधी दिली जाणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यशस्वी जैस्वालने यंदाच्या आयपीएल हंगामात तुफान फटकेबाजी करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 14 सामन्यात त्याने 625 धावा केल्या. यात एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. यशस्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना 15 प्रथम श्रेणी सामन्यात 1845 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 9 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय इराणी कपमध्ये शेष भारत संघाकडून त्याने पहिल्या डावात 213 आणि दुसऱ्या डावात 144 धावा केल्या. तर 32 लिस्ट आणि 57 देशांतर्गत टी20 सामने खेळळे आहेत. यात अनुक्रमे 1511 आणि 1578 धावा केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.