पुणे, 05 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत आता बरोबरी झाली आहे. निर्णायक सामना 7 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. भारताला दुसऱ्या टी20 सामन्यात 16 धावांनी पराभूत व्हावं लागलं. श्रीलंकेने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था 5 बाद 57 अशी झाली होती. तेव्हा भारताचा दारूण पराभव होईल असं वाटत होतं. मात्र सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी फटकेबाजी करत विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. मात्र अखेरच्या क्षणी श्रीलंकेने बाजी मारली. सामन्यात अक्षर पटेलने 31 चेंडूत 65 धावा केल्या. सातव्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी आला होता. भारताकडून टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सातव्या क्रमांकावर खेळताना कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. हेही वाचा : नो बॉल हा गुन्हा, हार्दिक पांड्या अर्शदीपवर भडकला; पराभवानंतर थेटच बोलला याआधी सातव्या किंवा यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना रविंद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या होत्या. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने नाबाद 44 धावांची खेळी केली होती. यानंतर आता दिनेश कार्तिकचं नाव येतं. दिनेश कार्तिकने 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 41 धावा केल्या होत्या.
महेंद्रसिंह धोनीने 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 38 धावा केल्या होत्या. सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा अक्षर पटेल हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. अक्षर पटेलने त्याच्या अर्धशतकी खेळीत तीन चौकार आणि सहा षटकार लगावले.