मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /कृणाल पांड्याच्या कोरोनाबाबत समोर आली धक्कादायक माहिती, टीमच्या डॉक्टरवरच प्रश्नचिन्ह

कृणाल पांड्याच्या कोरोनाबाबत समोर आली धक्कादायक माहिती, टीमच्या डॉक्टरवरच प्रश्नचिन्ह

श्रीलंका दौऱ्यावर असताना कृणालला कोरोनाची लागण

श्रीलंका दौऱ्यावर असताना कृणालला कोरोनाची लागण

श्रीलंका दौऱ्यावर असताना कृणाल पांड्याला (Krunal Pandya Corona Positive) कोरोनाची लागण झाली, यानंतर आता या प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुंबई, 13 ऑगस्ट : श्रीलंका दौऱ्यावर असताना कृणाल पांड्याला (Krunal Pandya Corona Positive) कोरोनाची लागण झाली, यानंतर आता या प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. कृणाल पांड्याचा घसा दुखत होता, याबाबत त्याने मेडिकल टीमला माहिती दिली, यानंतरही त्याची आरटी-पीसीआर टेस्ट एक दिवसाने करण्यात आली. यामुळे टीम इंडियाच्या डॉक्टरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कृणाल पांड्याची लगेच कोरोना टेस्ट केली असती, तर त्याच्या संपर्कात आलेले 8 खेळाडू क्वारंटाईन होण्यापासून वाचू शकले असते. कृणालच्या संपर्कात आल्यामुळे या खेळाडूंना उरलेल्या दोन टी-20 (India vs Sri Lanka) खेळता आल्या नाहीत.

कृणाल पांड्याचा घसा दुखायला लागल्यानंतर तो लगेच टीमचे डॉक्टर अभिजीत साळवी (Abhijeet Salvi) यांच्याकडे 26 जुलैला गेला, त्यावेळी कृणालची रॅपिड एन्टीजेन टेस्ट करण्यात आली नाही, तसंच त्याला क्वारंटाईनही करण्यात आलं नाही, असं वृत्त आता समोर येत आहे. एवढच नाही तर टीम बैठकीतही कृणालला परवानगी देण्यात आली. 27 जुलैला सकाळी कृणालची कोरोना टेस्ट करण्यात आली, यानंतर दुपारी आलेल्या रिपोर्टमध्ये कृणाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यानंतर बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेटने मॅच एका दिवसासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला कृणालच्या संपर्कात आलेल्या सगळ्या खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, पण श्रीलंका दौरा संपवून भारतात परत यायच्यावेळी कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात झालेल्या श्रीलंका दौऱ्यात भारताने वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवला, तर टी-20 सीरिजमध्ये टीमला 1-2 ने पराभव पत्करावा लागला.

'कृणालला 26 तारखेलाच घशाचा त्रास होत होता, यानंतर त्याने नियमानुसार टीमच्या डॉक्टरला याबाबत माहिती दिली, पण तरीही त्याची रॅपिड एन्टीजेन टेस्ट करण्यात आली नाही, किंवा त्याला क्वारंटाईन केलं गेलं नाही, हे हैराण करणारं आहे,' असं बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयशी बोलताना सांगितलं.

'रॅपिड एन्टीजेन टेस्ट निर्णायक नसते, पण हा नियमाचा भाग आहे. घसा दुखत असतानाही कृणाल टीम बैठकीला उपस्थित राहिला,' अशी प्रतिक्रिया सूत्रांनी दिली. श्रीलंका दौऱ्यात टीमची कोरोना टेस्ट प्रत्येक 5 दिवसानंतर केली गेली, पण आयपीएलमध्ये हीच टेस्ट प्रत्येक तीन दिवसानंतर व्हायची.

'जय शाह (Jay Shah) यांनी हस्तक्षेप केल्यामुळे सीरिजचं संकट टळलं आणि कृणालच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला क्वारंटाईन करण्यात आलं. जर मेडिकल टीम सतर्क असती तर या परिस्थितीमधून वाचता आलं असतं,' असंही सूत्रांनी सांगितलं. पीटीआयने याबाबत टीमचे डॉक्टर साळवी यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. टी-20 सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला, कारण भारताकडे फक्त 4 बॅट्समनच उरले होते. कृणालच्या संपर्कात आलेल्या 8 खेळाडूंना अखेरचे दोन सामने खेळता आले नव्हते.

First published:

Tags: India Vs Sri lanka, Krunal Pandya, Team india