जोहान्सबर्ग, 5 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs South Africa 2nd Test) शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) धमाकेदार कामगिरी केली आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी शार्दुलने दक्षिण आफ्रिकेच्या 7 विकेट घेतल्या. जोहान्सबर्गच्या या मैदानातली भारतीय बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. शार्दुल ठाकूरच्या या उत्कृष्ट बॉलिंगमुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या इनिंगमध्ये मोठी आघाडी घेता आली नाही. बॉलिंगमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर शार्दुलने बॅटिंगमध्येही आक्रमक खेळी केली, ज्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 रनचं आव्हान दिलं.
शार्दुल ठाकूरने दुसऱ्या इनिंगमध्ये 24 बॉलमध्ये 28 रन केले, यामध्ये 5 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता, म्हणजेच शार्दुलने 26 रन बाऊंड्रीच्या मदतीने केले. मार्को जेनसनच्या एका ओव्हरमध्ये त्याने दोन फोर मारल्या, यानंतर ड्रेसिंग रूममध्ये बसलेले विराट कोहली (Virat Kohli), मयंक अग्रवाल, बॅटिंग कोच विक्रम राठोड यांना हसू रोखता आलं नाही. टीमचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यानेही शार्दुलची बॅटिंग बघून टाळ्या वाजवल्या.

शार्दुल ठाकूरने या टेस्ट मॅचआधी 5 टेस्टच्या 8 इनिंगमध्ये 3 वेळा 50 पेक्षा जास्त रन केल्या आहेत. 67 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. शार्दुलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही बॅट आणि बॉलने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या मॅचआधी त्याने 67 मॅचच्या 92 इनिंगमध्ये 17 च्या सरासरीने 1458 रन केले आहेत, यात 9 अर्धशतकं आहेत. 87 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. याशिवाय त्याने 28 च्या सरासरीने 223 विकेटही घेतल्या आहेत. 12 वेळा त्याला 5 विकेट घेता आल्या. 31 रन देऊन 6 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा 266 रनवर ऑल आऊट झाला, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 रनचं आव्हान मिळालं. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकं केली, तर हनुमा विहारीने तळाच्या खेळाडूंना घेऊन नाबाद 40 रनची झुंजार खेळी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.