मुंबई, 17 जून : ऋषभ पंतसारखा (Rishabh Pant) आक्रमक खेळाडू अवघ्या काही ओव्हरमध्येच मॅचचा निकाल बदलवू शकतो, पण मागच्या काही काळापासून पंतची बॅट शांत आहे. खासकरून टी-20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) पंतला त्याच्या नावाच्या साजेसा खेळ करता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa) पहिल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये पंत फेल गेला. केएल राहुलला (KL Rahul) दुखापत झाल्यामुळे पंतला टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली. पण तो कॅप्टन्सीच्या दबावात असल्याचं दिसत आहे. ऋषभ पंतला मोठा स्कोअर करण्यात अपयश तर आलंच, पण त्याच्या कॅप्टन्सीमध्येही धार दिसली नाही. ऋषभ पंत अशीच कामगिरी करत राहिला तर त्याला टी-20 टीममधलं स्थान गमवावं लागू शकतं, असं वक्तव्य वसीम जाफरने (Wasim Jaffer) केलं आहे.
ऋषभ पंतचा फॉर्म बघता विकेटकीपर बॅट्समन म्हणून त्याचं टी-20 टीममधलं स्थान पक्कं नाही, असं वसीम जाफरला वाटत आहे. तो इएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलत होता.
'तुमच्याकडे केएल राहुल आहे, जो दुखापतीनंतर टीममध्ये कमबॅक करेल. त्याचं टीममधलं स्थान निश्चित आहे. तसंच तो विकेट कीपिंगही करू शकतो. जर तुम्ही दिनेश कार्तिकला खेळवत असाल तर तोही विकेट कीपर आहे. त्यामुळे पंतचा सध्याचा फॉर्म बघता, त्याचं टीममधलं स्थान पक्कं आहे, असं मला तरी वाटत नाही,' असं जाफर म्हणाला.
'पंतला सातत्याने रन कराव्या लागतील, तसंच त्याला कामगिरीमध्येही सातत्य ठेवावं लागेल. त्याने आयपीएल 2022 मध्येही निराशाजनक कामगिरी केली. टी-20 मध्ये त्याची कामगिरी मागच्या काही काळापासून फारशी चांगली झाली नाही. पंत टेस्ट क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळतो, वनडे क्रिकेटमध्येही त्याने काही चांगल्या खेळी केल्या आहेत. पण टी-20 मध्ये त्याला अशी कामगिरी करण्यात यश आलं नाही,' अशी प्रतिक्रिया जाफरने दिली.
ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांमध्ये एकूण 40 रन केल्या आहेत. याआधी आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेल्या पंतने 151 च्या स्ट्राईक रेटने 340 रन केले होते. संपूर्ण मोसमात तो एकही अर्धशतक करू शकला नव्हता. ऋषभ पंत जलद रन करण्याच्या नादात विकेट गमवत आहे. टेस्ट आणि वनडे प्रमाणे टी-20 मध्ये एक आक्रमक बॅट्समन म्हणून त्याला छाप पाडण्यात अपयश येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Rishabh pant, Team india