राजकोट, 17 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा (India vs South Africa 4th T20) 82 रननी दणदणीत विजय झाला आहे. भारताने दिलेलं 170 रनचं आव्हान पार करताना दक्षिण आफ्रिकेने 16.5 ओव्हरमध्ये 87 रनवर 9 विकेट गमावल्या. बॅटिंगवेळी दुखापत झालेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा रिटायर्ड हर्ट झाला, पण नंतर तो बॅटिंगला परतलाच नाही. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सगळ्यात मोठा टी-20 विजय आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा टी-20 क्रिकेटमधला हा सगळ्यात कमी स्कोअर आहे.
भारताकडून आवेश खानने (Avesh Khan) 4 ओव्हरमध्ये 18 रन देऊन 4 विकेट मिळवल्या. याशिवाय युझवेंद्र चहलला 2 तर हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. आफ्रिकेकडून रस्सी व्हॅन डर डुसेनने सर्वाधिक 20 रन केले, तर क्विंटन डिकॉकने 14 आणि मार्को जेनसनने 12 रनची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या विजयासोबतच टीम इंडियाने सीरिजमध्ये 2-2 ने बरोबरी केली आहे. आता सीरिजचा पाचवा सामना रविवारी 19 तारखेला बँगलोरमध्ये होणार आहे.
कार्तिक-हार्दिकची फटकेबाजी
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 मध्ये (India vs South Africa 4th T20) 169/6 पर्यंत मजल मारता आली आहे. दिनेश कार्तिकने 27 बॉलमध्ये 203.70 च्या स्ट्राईक रेटने 55 रन केले, यामध्ये 9 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय हार्दिक पांड्याने 31 बॉलमध्ये 3 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 46 रनची खेळी केली. दिनेश कार्तिकचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात कार्तिकने 42 रनची खेळी केली होती. तो टीम इंडियाचा पहिलाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताची सुरूवात खराब झाली. ऋतुराज गायकवाड 5 तर श्रेयस अय्यर 4 रनवर आऊट झाला. पॉवर प्ले संपल्यानंतर इशान किशनही 27 रनवर माघारी परतला. या सीरिजमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या कर्णधार ऋषभ पंतला या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. केशव महाराजने 17 रनवर पंतला आऊट केलं.
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या. याशिवाय मार्को जेनसन, ड्वेन प्रिटोरियस, एनरिच नॉर्किया आणि केशव महाराज यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india