मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : पटेल-चहलसमोर आफ्रिकेचं लोटांगण, टीम इंडियाचं दणदणीत कमबॅक!

IND vs SA : पटेल-चहलसमोर आफ्रिकेचं लोटांगण, टीम इंडियाचं दणदणीत कमबॅक!

Photo-BCCI

Photo-BCCI

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 3rd T20) 48 रननी दणदणीत विजय झाला आहे. भारताने दिलेलं 180 रनचं आव्हान पार करताना दक्षिण आफ्रिकेचा 19.1 ओव्हरमध्ये 131 रनवर ऑल आऊट झाला.

विशाखापट्टणम, 14 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 3rd T20) 48 रननी दणदणीत विजय झाला आहे. भारताने दिलेलं 180 रनचं आव्हान पार करताना दक्षिण आफ्रिकेचा 19.1 ओव्हरमध्ये 131 रनवर ऑल आऊट झाला. हर्षल पटेलने (Harshal Patel) दक्षिण आफ्रिकेच्या 4 तर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 3 विकेट घेतल्या, याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिच क्लासिनने सर्वाधिक 29 रन केले, तर हेन्ड्रिक्सने 23, पारनेलने नाबाद 22 आणि प्रिटोरियसने 20 रनची खेळी केली.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 179/5 पर्यंत मजल मारली. इशान किशन (Ishan Kishan) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या दोन ओपनरनी आक्रमक सुरूवात करून दिल्यानंतरही भारताला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. ऋतुराज आणि इशान यांच्यात 10 ओव्हरमध्ये 97 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे भारत 200 रनचा टप्पा गाठेल असं वाटत होतं, पण यानंतर टीमची बॅटिंग गडगडली.

ऋतुराज गायकवाडने 35 बॉलमध्ये 57 रन तर इशान किशनने 35 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली. हार्दिक पांड्या 21 बॉलमध्ये 31 रनवर नाबाद राहिला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, याशिवाय रबाडा, तबरेझ शम्सी आणि केशव महाराज यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

5 टी-20 मॅचच्या या सीरिजमधल्या पहिल्या दोन मॅच भारताने गमावल्या होत्या, त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं होतं. सीरिजची चौथी मॅच आता शुक्रवारी राजकोटला होणार आहे.

First published:

Tags: South africa, Team india