जोहान्सबर्ग, 5 जानेवारी : बॉलिंगमध्ये फार वेग नसताना, तसंच कर्णधाराचीही पहिली पसंती नसताना शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) जोहान्सबर्गमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात (India vs South Africa 2nd Test) शार्दुलने पहिल्या इनिंगमध्ये 61 रन देऊन 7 विकेट घेतल्या. शार्दुलच्या या कामगिरीमुळे भारताने या टेस्टमध्ये पुनरागमन केलं. काही वर्षांपूर्वी शार्दुलचा वेग आतापेक्षा जास्त होता, पण पाठीच्या दुखापतीमुळे त्याला आपला वेग कमी करावा लागला. शार्दुल ठाकूरने त्याचा वेग कमी केला असला तरी त्याची चलाखी कमी झालेली नाही. तो आधीपेक्षा जास्त आत्मविश्वासाने बॉलिंग करत आहे. याच कारणामुळे जेव्हा बाकीचे बॉलर विकेट घेण्यात अपयशी ठरतात तेव्हा कर्णधार थेट शार्दुलच्या हातात बॉल देतो. यानंतर तो काय करू शकतो, हे जोहान्सबर्ग टेस्टमध्ये समोर आलं. शार्दुल ठाकूरसाठी मागचं एक वर्ष धमाकेदार राहिलं. त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आता दक्षिण आफ्रिकेत शार्दुलने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. पण अनेक जण शार्दुल विकेट घेण्याच्या बाबतीत भाग्यशाली आहे, असं म्हणतात. चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी (L Balaji) याला मात्र असं वाटत नाही. शार्दुल समजूतदार बॉलर आहे. तो बॅटरना जाळ्यात अडकवतो. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये त्याने 7 विकेट घेताना आपल्या समजेचा पूर्ण वापर केला, त्यामुळे तो भाग्यशाली आहे, असं म्हणणं चुकीचं आहे, असं बालाजी म्हणाला. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बालाजीने शार्दुल ठाकूरच्या कामगिरीवर भाष्य केलं. ‘शार्दुल बहुतेकवेळा आऊट स्विंग बॉलिंग करतो, पण एल्गारविरुद्ध त्याने याचा वापर केला नाही. शार्दुलने डीन एल्गारला त्याच्या जाळ्यात अडकवलं,’ अशी प्रतिक्रिया बालाजीने दिली. ‘एल्गारची विकेट घेतल्यानंतर शार्दुल पुन्हा एकदा आऊट स्विंग बॉलिंग टाकायला सुरुवात केली. अशाच बॉलवर त्याने अर्धशतक केलेल्या कीगन पीटरसनला आऊट केलं. अशाच प्रकारे त्याने रस्सी व्हॅन डर डुसेन आणि दक्षिण आफ्रिकेच्या विकेट कीपरचीही विकेट घेतली. शार्दुलने बॅटिंग टीमची कमजोरी ओळखली,’ असं वक्तव्य बालाजीने केलं. ‘शार्दुल ठाकूर शांत राहणारा व्यक्ती नाही. त्याला जबाबदारी दिलेली आवडते. शेवटच्या ओव्हरमध्ये मला बॉलिंग का दिली नाही. किंवा नव्या बॉलने बॉलिंग का दिली नाही, असं शार्दुल विचारतो आणि त्याला उत्तरं हवी असतात. त्याला जेव्हा टीममध्ये त्याच्यापेक्षा चांगला बॉलर उपलब्ध होता किंवा त्याला या भूमिकेसाठी योग्य समजलं गेलं नाही, असं कळतं तेव्हा तो नेटमध्ये जाऊन त्याच्यातली कमी दूर करण्याचा प्रयत्न करतो. शार्दुलला कायमच नवीन गोष्टी शिकायच्या असतात,’ असं बालाजी म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.