जोहान्सबर्ग, 6 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 2nd Test) लाजिरवाणा पराभव झाला आहे. अखेरच्या इनिंगमध्ये वॉन्डरर्सच्या धोकादायक खेळपट्टीवर भारतीय बॉलर्सना दक्षिण आफ्रिकेला 240 रनवरही रोखता आलं नाही. कर्णधार डीन एल्गारने (Dean Elgar) नाबाद 96 रनची झुंजार खेळी केली. एल्गारला आफ्रिकेच्या इतर खेळाडूंनीही साथ दिली, त्यामुळे अशक्य वाटणारं हे आव्हान त्यांना पार करता आलं. या विजयासोबतच दक्षिण आफ्रिकेने सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे. आता सीरिजची अखेरची टेस्ट 11 जानेवारीपासून केप टाऊनमध्ये होणार आहे. भारताला अजूनही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. खरंतर याआधी जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाचा टेस्टमध्ये एकदाही पराभव झालेला नव्हता. याआधी झालेल्या 5 टेस्टपैकी टीम इंडिया 2 टेस्ट जिंकली होती, तर 3 टेस्ट ड्रॉ झाल्या होत्या. या सामन्यात विजय मिळवून सीरिजही जिंकण्याची ऐतिहासिक संधी भारतीय टीमकडे होती, पण टीमने केलेल्या चुकाच त्यांना महागात पडल्या. ऋषभ पंतचा खराब शॉट अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोघांनी दुसऱ्या इनिंगमध्ये केलेल्या अर्धशतकांमुळे टीम इंडियाला सावरलं होतं, पण यानंतर ऋषभ पंतने (Rishabh Pant) जबाबदारीने खेळणं गरजेचं होतं, असं असतानाही त्याने तिसऱ्या बॉललाच खराब शॉट मारला, ज्यामुळे तो शून्य रनवर माघारी परतला. ऋषभ पंत आऊट झाल्यानंतर कॉमेंट्री करणाऱ्या सुनिल गावसकर यांनीही त्याच्यावर संताप व्यक्त केला. राहुलची कॅप्टन्सी चौथ्या दिवसाच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. यानंतर खेळ सुरू झाला तेव्हाही ढगाळ वातावरण होतं. कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) बुमराह आणि शमीला पहिले बॉलिंग दिली, पण यानंतर त्याने ऑफ स्पिनर आर.अश्विनच्या (R Ashwin) हातात बॉल दिला. ढगाळ वातावरण असतानाही राहुलने शार्दुल ठाकूरवर (Shardul Thakur) विश्वास दाखवला नाही. शार्दुलने पहिल्या इनिंगमध्ये 7 विकेट घेतल्या असतानाही राहुलने त्याला एवढ्या उशीरा बॉलिंग का दिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर बुमराह फेल विराट कोहलीला दुखापत झाल्यानंतर केएल राहुलला या मॅचसाठी कर्णधार करण्यात आलं, तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. पण नवी जबाबदारी मिळाल्यानंतर बुमराह अपयशी ठरला. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 17 ओव्हर बॉलिंग केली, यात त्याला एकही विकेट मिळाली नाही, एवढच नाही तर त्याने 4.10 रन प्रती ओव्हर दिल्या. तर पहिल्या इनिंगमध्येही बुमराहला फक्त एक विकेट मिळाली. एल्गारला कमी लेखलं दुसऱ्या इनिंगच्या तिसऱ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारला बॉडी लाईन बॉलिंग केली, म्हणजेच एल्गारच्या शरिरावर भारतीय बॉलर्सनी बाऊन्सर टाकले. भारतीय बॉलर्सचे हे आघात अंगावर झेलूनही एल्गारने मैदानात झुंज दिली आणि दक्षिण आफ्रिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बॅटिंगमध्ये निराशा भारताने सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवला तो बॅट्समननी मोठा स्कोअर केल्यामुळे. पहिल्या टेस्टमध्ये केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 300 च्या वर स्कोअर केला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीवर पहिल्या इनिंगमध्ये एवढा स्कोअर केल्यानंतर विजय जवळपास निश्चित असतो. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये मात्र पहिल्या इनिंगमध्ये भारताचा 202 रनवरच ऑल आऊट झाला. बॅटिंग पुन्हा एकदा अपयशी ठरल्यामुळे भारताच्या पदरी निराशा आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.