पार्ल, 21 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या वनडेमध्ये (India vs South Africa) टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताने पहिले बॅटिंग करत दक्षिण आफ्रिकेला 288 रनचं आव्हान दिलं. एकवेळ भारताचा स्कोअर 300 रनपर्यंत जाईल, असं वाटत होतं, पण क्विंटन डिकॉकने (Quinton De Kock) केलेल्या जबरदस्त स्टम्पिंगमुळे हे शक्य झालं नाही. क्विंटन डिकॉकचा हा स्टम्पिंग बघून अनेकांना एमएस धोनीचीही (MS Dhoni) आठवण झाली. भारताची बॅटिंग सुरू असताना 44 वी ओव्हर टाकण्यासाठी मध्यम गती बॉलर एन्डिले पेहलुक्वायो आला, तेव्हा विकेट कीपर डिकॉक स्टम्पच्या जवळच उभा होता. ओव्हरचा पाचवा बॉल पेहलुक्वायोने लेग साईडच्या दिशेने वाईड टाकला. यानंतर डिकॉकने चपळता दाखवत काही सेकंदांच्या आतच बेल्स उडवल्या. यानंतर डिकॉकने अपील केलं आणि मैदानातल्या अंपायरने थर्ड अंपायरकडे जायचं ठरवलं. स्टम्पिंग केल्यानंतर डिकॉक आणि व्यंकटेश अय्यरलाही आऊट असल्याचं वाटलं नव्हतं, कारण डिकॉक पुन्हा एकदा स्वत:च्या जागेवर जाऊन उभा राहिला.
रिप्ले पाहिल्यानंतर मात्र व्यंकटेश अय्यरचा पाय हवेत असल्याचं दिसलं, ज्यामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. 33 बॉलमध्ये 22 रन करून व्यंकटेश अय्यर आऊट झाला, त्याने या खेळीमध्ये एक सिक्सही मारली. पहिल्या वनडेमध्ये डिकॉकने अगदी अशाच पद्धतीने पेहलुक्वायोच्याच बॉलिंगवर ऋषभ पंतलाही स्टम्पिंग केलं होतं. भारताने या सामन्यात पहिले बॅटिंग करून 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावल्या आणि 287 रन केले. ऋषभ पंतने सर्वाधिक 85 रनची खेळी केली. याशिवाय केएल राहुलने 55 रन केले. पहिल्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या शार्दुल ठाकूरने नाबाद 40 आणि आर.अश्विनने नाबाद 25 रन केले. भारतासाठी यंदाचा दक्षिण आफ्रिका दौरा निराशाजनक राहिला आहे. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवल्यानंतर पुढच्या दोन्ही टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला, ज्यामुळे टीमने टेस्ट सीरिज 2-1 ने गमवाली. यानंतर झालेल्या पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 31 रननी विजय झाला. आता दुसरी वनडे जर भारताने गमावली तर वनडे सीरिजही हातातून निसटून जाईल.