मुंबई, 1 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 1st Test) दणदणीत विजय झाला, तरीही भारताला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या टेस्टमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधला (WTC) एक पॉईंट कमी झाला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक कमी ओव्हरला एक पॉईंट कमी होतो. भारताने या टेस्टमध्ये निर्धारित वेळेच्या एक ओव्हर कमी टाकली, त्यामुळे टीमचा एक पॉईंट कमी करण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे भारतीय खेळाडूंना मॅच फीच्या 20 टक्के दंडही आकारण्यात आला आहे. मॅच रेफ्री ऍण्डी पायक्रॉफ्ट यांनी ही कारवाई केली आहे. मरेस इरासमस, ऍड्रियन होल्डस्टॉक, अल्लाहुद्दीन पालेकेर आणि बोगानी जेले या अंपायरनी स्लो ओव्हर रेटबद्दल मॅच रेफ्रीकडे तक्रार केली. भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ही तक्रार मान्य केल्यामुळे, याप्रकरणाची अधिकृत सुनावणी घेण्यात आली नाही. स्लो ओव्हर रेटमुळे पॉईंट्स कमी व्हायची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑगस्ट 2021 मध्येही नॉटिंघम टेस्टमध्ये भारताने 2 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉईंट्स गमावले होते. स्लो ओव्हर रेटमुळे गमावलेले हे पॉईंट्स भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोठा अडथळा ठरू शकतात. 2019-2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे पॉईंट्स गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. भारताविरुद्धच्या 2020 च्या मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने स्लो ओव्हर रेटमुळे 4 पॉईंट्स गमावले होते. याचा फटका ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बसला आणि न्यूझीलंडचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठीच्या दोन टीम परसेंटेज पॉईंट्सने ठरवल्या जातात. या नियमानुसार 2021-2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या, श्रीलंका दुसऱ्या आणि पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक टेस्ट सीरिज या रद्द करण्यात आल्या, त्यामुळे आयसीसीने पॉईंट्स टेबलच्या नियमांमध्ये बदल करून परसेंटेज पॉईंट्स द्यायचा निर्णय मागच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवेळी घेतला होता, हाच निर्णय यंदाही कायम राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







