सेंच्युरियन, 30 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या अखेरच्या दिवशी भारताला (India vs South Africa 1st Test Day 5) विजयासाठी आणखी 6 विकेटची गरज आहे. पाचव्या दिवसाचा खेळ दक्षिण आफ्रिकेने 94/4 असा सुरू केला आहे, त्यामुळे त्यांना विजयासाठी आणखी 211 रनची गरज आहे. डीन एल्गार 52 रनवर नाबाद खेळत आहे.
भारताने दिलेल्या 305 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात दुसऱ्या इनिंगमध्येही खराब झाली. एडन मार्करम एक रन करूनच आऊट झाला. तर कीगन पीटरसन 17 आणि रस्सी व्हॅन डर डुसेन 11 रन करून माघारी परतला. नाईट वॉचमन म्हणून बॅटिंगला आलेला केशव महाराज आऊट झाल्यानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. भारताकडून जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 2 तर मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
त्याआधी भारताचा दुसऱ्या इनिंगमध्ये 174 रनवर ऑल आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या 130 रनच्या आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 रनचं आव्हान दिलं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 34 रन केले. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि मार्को जेनसनला प्रत्येकी 4-4 विकेट घेण्यात यश आलं.
सेंच्युरियन टेस्टमध्ये विजय मिळवण्यासाठी आता भारताला अखेरच्या दिवशी आणखी 6 विकेटची गरज आहे, पण इथलं हवामान भारतीय टीमच्या स्वप्नावर पाणी टाकू शकतं. गुरुवारी सेंच्युरियनमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याआधी मॅचच्या दुसऱ्या दिवशीही पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता.