नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी : भारताने टी20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडला 5-0 ने लोळवलं. यामध्ये भारताचा फलंदाज केएल राहुलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. केएल राहुलने फक्त फलंदाजीतच नाही तर यष्टीरक्षणातही जबरदस्त कामगिरी केली. इतकंच काय त्याने विराट आणि रोहित संघात नसताना नेतृत्वही करून दाखवलं. पाचव्या सामन्यात दुखापतीमुळे रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. त्यामुळे ऐनवेळी केएल राहुलवर कर्णधारपदाची जबाबदारी आली. ही जबाबदारीही त्यानं यशस्वीपणे पेलली. सध्या केएल राहुलचे नाव त्याच्या मैदानावरील कामगिरीमुळे चर्चेत असलं तरी एक वेळ अशी आली होती की त्याला घरातून बाहेर पडण्याची भीती वाटत होती. त्यानं स्वत:ला एका खोलीत बंद केलं होतं आणि क्रिकेटही खेळणं सोडलं होतं.
गेल्या वर्षी 11 जानेवारीला केएल राहुलवर बीसीसीय़आने निलंबनाची कारवाई केली होती. त्याला कारण होतं. कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबद्दल हार्दिक पांड्याने केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य. त्यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पांड्या या दोघांनाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी बोलवण्यात आलं होतं. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात आली होती. बीसीसीआय़ने केलेल्या या कारवाईनंतर केएल राहुल पुर्णपणे ढासळला होता. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की बंदी घातल्यानंतर दोन आठवड्यापर्यंत घरातील एका खोलीत कोंडून घेतलं होतं. घरातून बाहेर पडण्यास भीती वाटत होती.
बंदीनंतर यशस्वी पुनरागमन
केएल राहुलला त्याच्यावर घातलेली बंदी दोन आठवड्यातच हटवल्यानंतर दिलासा मिळाला. त्यानंतर केएल राहुलचा समावेश इंडिया ए मध्ये करण्यात आला आणि 24 फेब्रुवारीला तो पुन्हा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला. निलंबनाच्या कारवाईनंतर केएल राहुलला एक जबाबदार क्रिकेटपटू बनवलं. त्यानंतर विशाखापट्टणम इथल्या टी20 सामन्यात 36 चेंडूत 50 धावांची खेळी केली. या सामन्यात विराट आणि रोहित अपयशी ठरले होते. भारताने तो सामना गमावला मात्र केएल राहुलच्या क्रिकेटला यामुळे नवसंजीवनी मिळाली.
वर्ल्ड कपच्या संघातही केएल राहुलला जागा मिळाली. वर्ल्ड कपमध्ये त्याने 9 सामन्यात 361 धावा केलया. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. बंदीनंतर आतापर्यंत केएल राहुलने 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात त्याने एकूण 1453 धावा केल्या आहेत. यात 2 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
टी 20 मध्ये वेगाने 4 हजार धावा करणारा भारतीय फलंदाज
पुनरागमनानंतर केएल राहुल टी20 क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 15 टी20 सामन्यात 634 धावा केल्या आहेत. यात 7 अर्धशतके झळकावली आहेत. केएल राहुल टी20 मध्ये सर्वात वेगाने 4 हजार धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने ही कामगिरी केवळ 117 डावात केली आहे. याबाबतीत त्याने विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे. विराटला 4 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 138 डाव खेळावे लागले.
दिग्गज क्रिकेटपटूंना टाकलं मागे
टी20 क्रिकेट म्हणजे फटकेबाजी आणि चौकार-षटकारांची आतषबाजीसाठी ओळखले जाते. टी20 मध्ये प्रत्येक सामन्यात सरासरी बाउंड्री मारण्यात केएल राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. केएल राहुल प्रत्येक सामन्यात सरासरी 4.97 बाउंड्री मारतो. तर विराट कोहली 4.39 बाउंड्रीसह पाचव्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर अॅरॉन फिंच आणि तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे.
भारताचा मोठा प्रश्न सोडवला
भारताच्या संघासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे धोनीनंतर यष्टीरक्षक कोण. याचे उत्तर आता केएल राहुलच्या रुपानं मिळालं आहे. त्याने स्वत:ला यष्टीरक्षक म्हणूनही सिद्ध केलं आहे. पाचव्या सामन्यात त्यानं न्यूझीलंडच्या ब्रूसला धावबाद करताना दाखवलेली चपळाई कौतुकास्पद होती. ऋषभ पंतला धोनीचा वारसदार समजलं जात होतं पण तो चांगली कामगिरी करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पंतला दुखापत झाल्यानतंर केएल राहुलने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली ती अजुनही त्याच्याकडेच आहे.
विराट आणि विल्यम्सनच्या PHOTO चा सोशल मीडियावर धुमाकूळ, कारण माहित आहे का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket