INDvsNZ : विराटसह या 5 फॅक्टरमुळे टीम इंडियावर 3-0 ने पराभवाची नामुष्की!

INDvsNZ : विराटसह या 5 फॅक्टरमुळे टीम इंडियावर 3-0 ने पराभवाची नामुष्की!

टी20 मध्ये हिरो ठरलेल्या टीम इंडियातील खेळाडूंना एकदिवसीय मालिकेत मात्र कमाल करता आली नाही.

  • Share this:

हॅमिल्टन, 11 फेब्रुवारी : टी20 मध्ये ऐतिहासिक विजय साजरा करणाऱ्या टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत मात्र नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. गेल्या 30 वर्षातील मानहानीकारक पराभवाची नोंद विराटसेनेच्या नावावर जमा झाली. न्यूझीलंडला टी20 मध्ये 5-0 ने धूळ चारणारी टीम इंडिया वनडेमध्ये मात्र सपशेल फेल झाली. भारताला न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पहिल्यांदाच भारताची न्यूझीलंडशी गाठ पडली होती. टी20मध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या टीम इंडियाने वनडेमध्ये मात्र शरणागती पत्करली.

आघाडीची फळी कमकुवत

भारताच्या आघाडीच्या फळीतील प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीचा फटका संघाला बसला. रोहित-धवन दुखापतीमुळे बाहेर आहेत. त्यांच्या जागी पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल ही जोडी सलामीला उतरली. मात्र त्यांना म्हणावी तशी सुरुवात करून देता आली नाही. पहिल्या वनडेमध्ये 8 व्या षटकात तर तिसऱ्या वनडेत तिसऱ्याच षटकात भारताची सलामीची जोडी फुटली.

विराट अपयशी

भारताचा कर्णधार विराट कोहलीसुद्धा वनडे मालिकेत अपयशी ठरला आहे. पहिल्या वनडेत अर्धशतक करणाऱ्या कोहलीला त्यानंतरच्या दोन सामन्यात मात्र मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत एकूण फक्त 75 धावा केल्या.

गोलंदाजांकडून धावांची खैरात

पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही भारताच्या गोलंदाजांना त्याचे संरक्षण करता आलं नाही. भारतीय गोलंदाजांकडून अवांतर धावांची खैरात कऱण्यात आली. मालिकेत सर्वात महागडा ठरलेला शार्दुल ठाकुर भारतासाठी व्हिलन ठरला. त्याने मालिकेत 222 धावा दिल्या. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराहला एकही विकेट घेता आली नाही. तसंच नवदीप सैनी, शमी, कुलदीप यादव यांचा इकॉनॉमी रेट 6 पेक्षा जास्त आहे.

खराब क्षेत्ररक्षण

भारतीय संघाच्या खराब कामगिरीत क्षेत्ररक्षणाचाही वाटा आहे. पहिल्या वनडेमध्ये 347 धावा करूनही भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात कुलदीप यादवनं फक्त दहा धावांवर रॉस टेलरचा झेल सोडला होता. त्यानंतर टेलरनं शतकासह न्यूझीलंडला सामना जिंकून दिला. फिल्डिंग कोच श्रीधर यांनीही भारतीय संघ सलग सामन्यांमुळे फिल्डिंगच्या सरावासाठी वेळ देऊ शकत नसल्याचं म्हटलं होतं.

संघ निवड

टीम इंडियाच्या निवडीवरही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताने तीन एकदिवसीय सामन्यात शार्दुल ठाकुरला संधी दिली. तो फॉर्ममध्ये नसताना भारताने हा धोका पत्करला. तर दुसरीकडे ऋषभ पंतला संघाबाहेर ठेवलं. मनिष पांडे फॉर्ममध्ये असतानाही त्याची वर्णी लागली नाही.

30 वर्ष 11 कर्णधार…आता भारतानं बघितला असा लाजीरवाणा दिवस

First published: February 11, 2020, 7:06 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या