हैदराबाद, 18 जानेवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 12 रननी रोमांचक विजय झाला आहे. भारताने दिलेल्या 350 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा 337 रनवर ऑल आऊट झाला. किवी टीमने पहिल्या 6 विकेट 131 रनवरच गमावल्या, पण यानंतर मिचेल ब्रेसवेल आणि मिचेल सॅन्टनर यांनी भारतीय बॉलिंगवर आक्रमण केलं. ब्रेसवेलने 78 बॉलमध्ये 140 आणि सॅन्टनरने 45 बॉलमध्ये 57 रन केले.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. शुभमन गिलने केलेल्या द्विशतकामुळे भारताला 50 ओव्हरमध्ये 349/8 पर्यंत मजल मारता आली. या सामन्यात भारताने इशान किशनला संधी दिली. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये इशान किशनला बेंचवरच बसावं लागलं. पण न्यूझीलंडविरुद्ध केएल राहुल खेळत नसल्यामुळे इशानला रोहित शर्मा आणि राहुल द्रविडने संधी दिली. या संधीचं इशान किशनला सोनं करता आलं नाही.
पहिल्या वनडेमध्ये इशान किशन 5 रन करून आऊट झाला. बांगलादेशविरुद्ध द्विशतक केल्यानंतर इशान किशन चर्चेत आला. त्याला वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाचा प्रबळ दावेदारही मानलं जात आहे, पण आगामी काळात चांगली कामगिरी केली नाही तर त्याला पुन्हा टीमबाहेर बसावं लागू शकतं.
इशान किशनने त्याच्या इनिंगमध्ये एकही बाऊंड्री लगावली नाही. 14 बॉलमध्ये त्याला फक्त 5 रनच करता आले. 20 वी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या लॉकी फर्ग्यूसनने चौथ्या बॉलवर इशान किशनला टॉम लेथमकरवी कॅच आऊट केलं.
इशान किशनने मागच्या वर्षी 10 डिसेंबरला बांगलादेशविरुद्ध द्विशतक केलं होतं. 131 बॉलमध्ये त्याने 210 रनची विस्फोटक खेळी केली होती. सगळ्यात जलद द्विशतक करण्याचा विक्रमही इशान किशनच्या नावावर झाला होता. सगळ्यात लहान वयात द्विशतक करण्याचं रेकॉर्डही किशनने केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Team india