नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ऋषभ पंत 11 व्या स्थानावर पोहचला आहे. 715 रेटिंग मिळवत ऋषभ पंतने हे स्थान मिळवलं आहे. विकेट कीपर्समध्ये असा विक्रम करणारा आणि 700 गुणांचा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीने त्याच्या कारकिर्दीत 662 गुण मिळवले होते. तर फारूख इंजीनियरचे 619 गुण होते. धोनीची सर्वोत्कृष्ट रँकिंग 19 व्या क्रमांकावर होती तर फारुख सुद्धा 17 व्या स्थानी पोहचला होता. सलग चार कसोटीत अर्धशतक: ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून ऋषभ पंत हा जबरदस्त फॉर्म मध्ये खेळत आहे. त्याने सिडनी कसोटीच्या चौथ्या डावात 87 धावांची खेळी केली ज्यामुळे भारत तो कसोटी सामना ड्रा करू शकला. त्यानंतर ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या डावात पंतच्या नाबाद 89 धावांमुळे भारताला ऐतिहासिक विजय मिळवता आला. यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना त्याने पहिल्या कसोटी सामन्यात 91 धावांची खेळी केली आणि चेन्नई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 77 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने सुद्धा शानदार गोलंदाजी आणि सोबतच फलंदाजीचे सुद्धा प्रदर्शन केले. चेन्नई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अश्विनने दुसऱ्या डावात 106 धावा केल्या आणि सामन्यात 8 विकेट घेतल्या. हा सामना भारताने 317 धावांनी जिंकला. त्याने केलेल्या या शानदार कामगिरीमुळे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आता तो पाचव्या स्थानावर पोहचला आहे. तर दुसरीकडे कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. चेन्नई कसोटीत 161 धावा करणारा भारतीय सलामीवीर रोहित शर्मा 9 स्थानांची झेप घेत 14 व्या स्थानावर पोहचला आहे. गोलंदाजांच्या यादीत अश्विन 7 व्या क्रमांकावर गोलंदाजांच्या यादीत अश्विन 804 गुणांसह सातव्या स्थानी आहे तर त्यापाठोपाठ जसप्रीत बुमराह 761 गुण घेऊन आठव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा पैट कमिन्स 908 गुणांसह या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये अश्विनचे आता 336 गुण झाले आहेत. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर 407 गुणांसह वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर आहे. त्याच्यापाठोपाठ अश्विनचा फिरकी साथीदार रवींद्र जडेजा 403 गुण, इंग्लंडचा बेन स्टोक्स 397 गुण आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन 352 यांचा नंबर लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.